Vidarbha Weather Update : नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने (IMD forecast) नागपूर जिल्ह्यात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये काहो ठिकाणी वादळीवारा तसेच मेघगर्जना आणि पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. तर विदर्भातील (Vidarbha Rain Update) चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या गडगडाटसह हलका ते मध्यम पाऊस (Rain Update) होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील मोठे व मध्यम स्वरूपाचे धरणे जवळपास 70% भरलं आहे. तर लघु प्रकल्प जवळपास 75% भरलेले आहेत. तर दुसरीकडे नदी आणि नाले यांना अतिवृष्टीमुळे चांगलेच प्रवाह झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्याला दोन दिवस ऑरेंज अलर्टचा इशारा
हवामान विभागाने 14 ऑगस्टपर्यंत यवतमाळ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. या काळात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नदी नाल्या काठवरील नागरिकांनी सतर्तता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कपाशी सोयाबीन या पिकांसाठी हा पाऊस नव संजीवनी देणारा ठरत आहे.
अमरावती जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरवात; शेतकऱ्यांमध्ये उत्साहाच वातावरण
अमरावतीत गेल्या दहा-बारा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आज सकाळ पासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला. त्यानंतर मात्र 11.15 च्या दरम्यान जाेरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. पावसाने दांडी मारल्याने पिकांनी आपल्या मानाखाली टाकल्या होत्या, मात्र आज आलेल्या पावसामुळे पिकांनाही संजीवनी मिळाली आहे. 13 तारखे पासून हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाचे संकेतही दिले आहेत. तसेच नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. जुलै अखेरपर्यंत सरासरीपेक्षा 21 टक्के अधिक असलेला पाऊस दहा-बारा दिवसाच्या खंडामुळे सरासरीच्या खाली गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढली हाेती. मात्र या पावसाने शेतकऱ्याची चिंता मिटली आहे.
चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस, अनेक रस्ते जलमय
चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. या पावसामुळे चंद्रपूर शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहे. विशेषतः चंद्रपूर शहरातील पठाणपुरा, बिनबा गेट, जलनगर, भानापेठ आणि तुकूम यासारख्या भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. मुसळधार पाऊस आणि रस्त्यावर साचलेलं पाणी यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरून वाट काढणे अतिशय जिकरीचं जात आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेलं आहे. विशेषत: शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना या पावसामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 60 टक्के पाऊस झाला असून अशा प्रकारच्या मुसळधार पावसाची गरज होती. विशेषत जिल्ह्यातील धरण भरण्यास या पावसामुळे मदत होणार आहे.
इतर महत्वाचा बातम्या