Vidarbha Weather Update : विदर्भात पावसाचा कहर! मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Vidarbha Weather Update : राज्यासह विदर्भात देखील आज दमदार पावसाने (Rain) हजेरी लावली असून पहाटेपासून कोसळत असलेल्या पावसाने अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Vidarbha Weather Update : राज्यासह विदर्भात देखील आज दमदार पावसाने (Rain) हजेरी लावली असून पहाटेपासून कोसळत असलेल्या पावसाने अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आज (26 जुलै) पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुफान पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. नागपूर वेध शाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील 27 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहे. तर देवरी तालुक्यातील 10, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 7, आमगाव तालुक्यातील 4 तर गोरेगाव, तिरोडा तालुक्यातील 6 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याची माहिती समोर आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील एकूण 27 मार्ग वाहतुकीसाठी बंद
गोंदिया जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस बरसत असल्याने अनेक भागातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर गोंदिया जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद ही झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील एकूण 27 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाली असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा उपयोग करावे व जिथे पूर असेल तेथून आवागमन करू नये, असे आवाहन गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
भंडाऱ्यातील आठ मार्ग वाहतुकीसाठी बंद
दुसरीकडे, भंडाऱ्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळं नदीनाले ओसंडून वाहू लागले आहेत. अशात जिल्हा अंतर्गत मार्गावरील गावांना जोडणाऱ्या आठ गावांच्या मार्गावर पाणी असल्यानं हे मार्ग वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनानं बंद केले आहे. भंडारा शहराजवळील वैनगंगा नदीवरून कारधा गावाकडं जाणाऱ्या लहान पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली असून खमारी नाल्यावरून पाणी असल्यानं तो मार्गही बंद झाला आहे. यासोबतचं साकोली तालुक्यातील विर्शी ते उकारा, चिंगी ते खोबा, गिरोला ते बोंडे, सराटी ते चीचगाव, नेहारवानी ते कटनधरा, लाखनी तालुक्यातील मिरेगाव ते सोनमाळा हे आठ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.
मेळघाट भागात मुसळधार पाऊस, रस्ते वाहतूक विस्कळीत
अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाटमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. आज शनिवार रोजी सकाळी 10 वाजता मुसळधार पावसाने धारणी तालुक्यातील उतावली गावाजवळ चाकरडा पाटीयाकडे जाणारा मार्ग दोन तासांपासून बंद आहे. मार्गावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक सुद्धा आता विस्कळीत झाली आहे. 24 तास मुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, पर्लकोटा नदीचा पूर ओसरले, मात्र 3 मार्ग बंदच
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णता विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे. सिरोंचा-जगदलपूर हा राष्ट्रीय महामार्ग कालपासून बंदच असून अहेरी-वटरा आणि कढोली ते उराडी हे दोन मार्गही बंद आहेत. दरम्यान भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने काल तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला होता. आज सकाळी हा मार्ग सुरू झाला आहे. काल गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट होता. तर आज ऑरेंज अलर्ट आहे. मध्यरात्री पासून जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू
गोंदियातील सहयोग रुग्णालयाच्या परिसरात शिरला पुराचे पाणी
मुसळधार पावसामुळे गोंदिया शहर जलमय झाला असून गोंदिया शहरातील सहयोग रुग्णालय परिसरामध्ये पाणी शिरले आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच तारांबळ उडाली असून रुग्णालय समोरील पार्किंग यार्डमध्ये दीड ते दोन फूट पाणी साचले आहे. हे पाणी इंजिन पंपच्या माध्यमातून उपसुन काढण्याचे काम रुग्णालय प्रशासनाच्या वतीने केले जात आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या


















