Vidarbha Rain Update: विदर्भात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच! नागपूरसह 9 जिल्ह्यांमध्ये जून महिन्याच्या सरासरी पावसापेक्षा कमीच पाऊस
Maharashtra Weather Update: राज्यातील बहुतांश भागात दमदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली असली तरी विदर्भतील अनेक जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाने पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.

Maharashtra Weather Update: राज्यातील बहुतांश भागात दमदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली असली तरी विदर्भतील अनेक जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाने पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. नागपूर प्रादेशिक विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 1 जून ते 30 जून या कालावधीत विदर्भातील 9 जिल्ह्यांमध्ये जून महिन्याच्या सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यात फक्त बुलढाणा आणि वाशिम या दोनच जिल्ह्यात जून महिन्याची सरासरी ओलांडली गेली आहे.
तर 1 ते 30 जून या कालावधीत विदर्भात एकूण 175 मिलिमीटर पावसाची नोंद होते. मात्र यंदा केवळ 155 मिलिमीटर पावसाचीच नोंद झाली आहे. त्यातल्या त्यात सर्वात कमी पाऊस नागपूर जिल्ह्यात झाला असून सरासरी 173 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत फक्त 98 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच पावसाची तूट 44% इतकी आहे.
विदर्भात 175 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत केवळ 155 मिलिमीटर पाऊस
पुढे आलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यात 187 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत फक्त 111 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच ही पावसाची तूट 40% इतकी आहे. अमरावती जिल्ह्यात 150 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत फक्त 100 मिलिमीटर पाऊस झाला आहे. म्हणजे पावसाची तूट झाली आहे 33%. गोंदिया जिल्ह्यात 196 मिलिमीटर सरासरी पावसाच्या तुलनेत फक्त 135 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच पावसाची तूट 30% आहे. तर वर्धा जिल्ह्यात 170 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत 135 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि अकोला या चार जिल्ह्यात पाऊस समाधानकारक झाला असून पावसाची तूट अत्यंत नगण्य आहे. परिणामी, विदर्भातील फक्त बुलढाणा आणि वाशिम या दोन जिल्ह्यातच जून महिन्याची पावसाची सरासरी ओलांडली गेली असून तिथे सामान्य पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
पहिल्या पावसातचं भंडाऱ्याच्या राष्ट्रीय महामार्गावरील बायपासच्या कडा गेला वाहून
भंडारा शहरालगत मुंबई - कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर सुमारे 650 कोटी रुपयांच्या खर्चातून 15 किलोमीटरच्या बायपासची निर्मिती करण्यात आली. मात्र, मागील 24 तासांपासून भंडारा जिल्ह्यात आलेल्या पहिल्याचं जोरदार पावसात या बायपास महामार्गाच्या सुरक्षेकरिता निर्माण करण्यात आलेल्या कडा वाहून गेल्यात. या सिमेंटच्या कडा वाहून गेल्यानं त्याखालील मातीही आता पाण्यासोबत बाहेर निघायला सुरुवात झाली. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची आणि फोरव्हीलर वाहनांची भरधाव वाहतूक असते. विशेष म्हणजे, भंडारा शहरात होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचे प्रमाण लक्षात घेता हा बायपास महामार्ग उद्घाटनापूर्वीचं सुरू करण्यात आलाय. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला या बायपास महामार्गावरील कडा उद्घाटनापूर्वीचं पावसामुळं घसरल्यात आणि महामार्गावर भरण केलेलं मातीही हळूहळू निसरडू लागल्यानं याचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याचा आरोप खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी केलाय.
इतर महत्वाच्या बातम्या


















