Vidarbha Rain Update : पूर्व विदर्भात पावसाचा कहर! गडचिरोली जिल्ह्याला पुराचा धोका; गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले; अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद
Vidarbha Rain Update : विदर्भात पावसाची संततधार सुरु असून पूर्व विदर्भात पावसानं अक्षरक्ष: कहर केल्याचे पाहायला मिळत आहे. सततच्या पावसामुळे अनेक नदी, नाले धरणं ओसंडून वाहू लागले आहेत.

Maharashtra Weather Update: हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यातच विदर्भातही संततधार सुरु असून पूर्व विदर्भात पावसाचा (Vidarbha Rain Update) अक्षरक्ष: कहर केल्याचे पाहायला मिळत आहे. सततच्या पावसामुळे अनेक नदी, नाले धरणं ओसंडून वाहू लागले आहेत. तर अनेक भागांत पूरसदृश स्थिती तयार झालीय. सोबतच अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहे. संभाव्य परिस्थिति बघता नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील 21 मार्ग वाहतुकीसाठी बंद
गोंदिया जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे नदी नाल्यांच्या पातळीत वाढ झाली असून अनेक ठिकाणी नाल्यांच्या पुलालावर पाणी आले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील एकूण 21 मार्ग वाहतुकीसाठी आतापर्यंत बंद झालेले आहेत. मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 10, देवरी तालुक्यातील 10, तर गोंदिया तालुक्यातील एक मार्ग बंद झालेला आहे. तर सतत नदी नाल्यांच्या पाणी पात्रात वाढ होत असल्याने गोंदिया जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आला आहे.
भंडाऱ्यातील 13 रस्ते वाहतुकीसाठी बंद
मागील 36 तासांपासून भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसानं नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळं जिल्हा अंतर्गत 13 रस्त्यांवरून पावसाचं पाणी वाहत असल्यानं जिल्ह्यातील 13 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. तुमसर तालुक्यातील 8, मोहाडी तालुक्यातील 3 तर, भंडारा तालुक्यातील 2 रस्त्यांचा यात समावेश आहे. दरम्यान, नदी काठावरील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे.
पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 10 मार्ग बंद
गडचिरोली जिल्ह्यात कालपासून कुठे जोरदार तर कुठे रिपरिप पाऊस सुरू आहे. सोमवारी देसाईगंज, कुरखेडा उपविभागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक लहान नाल्यांना पूर आला असून कुठे पुलावर पाणी तर कुठे रस्ता वाहून गेल्यामुळे तब्बल 10 जिल्हा मार्ग बंद झाले आहे. यामध्ये कुरखेडा- मालेवाडा हा राज्यमार्ग खोब्रागडी नदीच्या पुरामुळे बंद आहे. तर कोरची- बोटेकसा- भीमपूर, कुरखेडा- वैरागड, मांगदा- कलकुली, कढोली ते उराडी, चातगाव- रांगी- पिसेवाडा, गोठनगडी- चांदागड- सोनसरी, कुरखेडा- तळेगाव- चारभट्टी, आंधळी- नैनपुर, शंकरपूर- जोगीसाखरा- कोरेगाव चोप हे दहा जिल्हा मार्ग सद्यस्थितीत बंद आहेत.
गडचिरोली जिल्ह्याला पुराचा धोका, वैनगंगा नदी दुथडी
गडचिरोलीत कालपासून जिल्ह्यात संततदार पाऊस सुरू आहे. त्यातच गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले असून साडेतीन लाख पेक्षा जास्त क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी आज सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात पोहोचण्याची शक्यता असून मोठ्या पूर परिस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. गडचिरोली जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट तर आज मंगळवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी या तालुक्यात वैनगंगा तर अहेरी, सिरोंचा या तालुक्यात प्राणहिता नदीच्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडलीत
गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, गोसेखुर्द धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनानं पहाटेपासून सर्व 33 दरवाजे उघडली आहे. या 33 दरवाजांमधून २ लाख ८३ हजार ३५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे. 33 पैकी ९ दरवाजे दीड मीटरनं तर, उर्वरित २४ दरवाजे एक मीटरनं उघडली आहे. मध्यप्रदेश आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्यानं दुपारपर्यंत पाण्याच्या विसर्गात आणखी मोठी वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदी काठावरील गावातील तसेच नदी पात्रातून आवागमन करणाऱ्यांनी सतर्क राहावं, असं जिल्हा प्रशासन आणि धरण प्रशासनानं आवाहन केलं आहे.
हे ही वाचा























