Nagpur News : बीडमध्ये खोक्या भोसलेच्या (Satish Bhosale) घरासह इतर पारधी नागरिकांचे घर उध्वस्त केल्याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम (Dharmpal Meshram) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये असं घडणं दुर्दैवी असल्याचे मत मेश्राम यांनी व्यक्त केलं आहे. ते काल(14 एप्रिल) नागपुरात "आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषद" मध्ये बोलत होते.
वन अधिकाऱ्यांनी जरी खोक्या भोसलेचा घर अतिक्रमण विरोधी कारवाई म्हणून पाडलं असलं, तरी गावगुंडांच्या मदतीने इतर पारधी नागरिकांचे घर पाडण्यात आले, त्यांचे घरगुती साहित्य नष्ट करण्यात आले, हे दुर्दैवी असल्याचे ही मेश्राम म्हणाले. एवढेच नाही तर महाराष्ट्रमध्ये आदिवासींच्या हिताचं रक्षण करणारे सरकार असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही धर्मपाल मेश्राम यांनी दिला आहे.
खोक्याचं कुटुंब उघड्यावर, पालकमंत्री अजित पवारांची भेट घेणार
खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या (Satish Bhosale) शिरूर कासार गावात असलेल्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला होता. वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं होतं. त्यामुळे वनविभागाने ही कारवाई केली होती. या आधी वनविभाने नोटिस पाठवली होती. पण 48 तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यामुळे परिणामी ही कारवाई करण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आलंय.
दरम्यान, याच मुद्याला घेऊन खोक्या भोसले आणि त्यांच्या नातेवाईकांनी वनविभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय खोक्या भोसले आणि त्यांच्या नातेवाईकांच कुटुंब हे उघड्यावर आल आहे. या कारवाई च्या संदर्भात आणि पुनर्वसनाच्या प्रश्नसंदर्भात खोक्या भोसले यांची पत्नी तेजू भोसले आणि नातेवाईक हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पक्ष कार्यालयातही आले होते. अशातच याच मुद्यावर बोट ठेवत बीडमध्ये खोक्या भोसलेच्या घरासह इतर पारधी नागरिकांचे घर उध्वस्त केल्याचा आरोप अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे. सोबतच या कृत्याचे तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
अशातच, भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोख्या उर्फ सतीश भोसलेच्या या घरावरील कारवाई प्रकरणी वनमंत्री गणेश नाईकांनी (Ganesh Naik) मोठं विधान करत कारवाई संदर्भात सुतोवाच केलं आहे. वन अधिकाऱ्यांनी खोक्या भोसलेच्या कुटुंबीयांच घर वनक्षेत्राच्या बाहेर असताना पाडला असेल, तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. मात्र वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून ते राहत असेल, तर वन विभागाची कारवाई योग्यच म्हणावी लागेल. किंबहुना वनक्षेत्राच्या बाहेर जाऊन वनाधिकाऱ्यांनी घर पाडले असतील तर चौकशी अंती वनाधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल. असेही वनमंत्री गणेश नाईकांनी यावेळी सांगितलंय.
इतर महत्वाच्या बातम्या