Tuljapur News धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दरवर्षी अश्विन अमावस्येला भेंडोळी उत्सव (Tuljapur Bhendoli Utsav) साजरा करण्यात येतो. यंदा देखील तुळजापुरात (Tuljapur) हाच उत्सव मोठ्या उत्साहात आणो धगधगत्या अग्नीचा थरारक 'भेंडोळी' उत्सव संपन्न झाला. 'आई राजा उदो उदो' आणि 'भैरवनाथ चांगभलं' या घोषणेत अग्नीचा लोळ अंगाखांद्यावरून नेण्याचा थरार सुमारे दीड तास सुरू होता. भेंडोळी उत्सव उत्तरेत काशी आणि दक्षिणेत तुळजापूर येथेच फक्त साजरा होतो. आगीच्या ज्वालासह एका छोट्याशा रस्त्यातून भेंडोळी घेऊन देवीच्या मंदिरात जाणं हा एक थरारक अनुभव असतो. भेंडोळी प्रज्वलनानंतर कालभैरव मंदिरापासून श्रीतुळजाभवाणी देवीच्या मंदिरात आणली जाते. नंतर देवीला पदस्पर्श करून मंदिराला प्रदक्षिणा करून वेशीबाहेर आणून भेंडोळी विझवली जाते.
Tuljapur Bhendoli Utsav : भेंडोळी काय आहे?
भेंडोळी म्हणजे एका अकरा फूट लांब आणि साधारण सात ते आठ इंच जाडीच्या काठीला (दांड) मधोमध कच्च्या केळीचा अखंड घड बांधला जातो. नंतर संपूर्ण दांडावर केळीच्या खोडाचे जे साल गुंडाळतात नंतर चिंचेच्या झाडाच्या छोट्या छोट्या फांद्यांचा एक थर संपूर्ण दांडावर लावला जातो. यावर आंबड्याच्या झाडाची साल व पीळ घातलेल्या दोरीचा वापर करून सर्व बांधणी झाल्यानंतर एका लोखंडी साखळदंडामध्ये सुती कपड्याचे पलिते तेलामध्ये बुडवून ओवले जातात. भेंडोळीची संपूर्ण बांधणी तयारी व भेंडोळी प्रज्वलन श्री काळभैरव मंदिराच्या समोर केली जाते.
Sajjangad : सज्जनगड उजळला भक्तीच्या तेजात
सज्जनगडावर दिवाळीची पहिली पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शेकडो मशालींच्या प्रकाशाने सज्जनगड भक्तीच्या तेजात उजाळला होता.या भव्य आणि पारंपारिक मशाल महोत्सवाचे आयोजन सज्जनगड दुर्गनाद प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. पहाटे चार वाजताच (वाहनतळ) येथून फुलांनी सजवलेल्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक सुरू झाली. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि रांगोळीच्या सजावटीतून पालखीचा मार्ग प्रकाशमान झाला. पालखीच्या मागे शेकडो मावळे मशाली हातात घेऊन ‘जय शिवाजी’च्या घोषात गाईमुख, श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार, श्री समर्थ महाद्वार या पारंपारिक मार्गाने पालखी अंगलाई मंदिरात पोहोचली. या वेळी शेकडो मशालींच्या ज्योतीने तसेच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे तटबंदी उजळली आणि खालील परळी पंचक्रोशीवर त्या प्रकाशाची झळाळी उमटली.
समाधी मंदिर परिसरात छत्रपतींच्या पालखीचे आगमन होताच संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. आशोक वनात सहासी खेळाबरोबरच शाहिर रंगराव पाटील (कोल्हापूर) यांचा शिवकालीन ऐतिहासीक पोवाड्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला, तसेच सर्व भक्तांनी मिळून “ध्येय मंत्र” म्हणत एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी विविध जिल्ह्यातून भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. या वेळी शिवरायांच्या पवित्र भूमीवर शेकडो मशालींच्या तेजाने उजळलेला सज्जनगड पाहताना प्रत्येकाच्या मनात अभिमान आणि भावनांचा संगम दाटून आला होता. या सर्व कार्यक्रमाचे उत्तम आयोजन सज्जनगड दुर्गनाद प्रतिष्ठान कडून करण्यात आले होते.
हेही वाचा>>