Nagpur News : भाजप आमदार कृष्ण खोपडे (Krishna Khopde) यांनी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या विरोधात कारवाईची मागणी केल्यानंतर पहिल्यांदाच तुकाराम मुंढे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. एबीपी माझाशी बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा. मी नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून तेव्हापासूनच माझ्या विरोधात वारंवार कट रचून त्रास दिले जात आहे. जे खोटे आरोप लावण्यात आले त्याची चौकशी झाली, मला क्लीन चीट मिळाली, तरी वारंवार तेच आरोप करून मानसिक त्रास दिले जात आहे. ही एका प्रामाणिक अधिकाऱ्याची हर्रासमेन्ट आहे. अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

Continues below advertisement

Tukaram Mundhe : एबीपी माझाच्या प्रतिनिधींशी भेटून तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?

मला नागपूरच्या माझ्या कार्यकाळात काम करू दिले नाही. काहींनी अनेक अडथळे आणले. खोटे आरोप करून विविध चौकश्या माझ्या मागे लावल्या. चौकशीत मी निर्दोष आढळलो. तरी माझ्यावर तेच आरोप वारंवार करण्यात आले. एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा. एकप्रकारे ही हर्रासमेन्ट नाही का? मी झुकलो नाही, म्हणून माझ्या विरोधात महिलांना समोर करून खोटे आरोप लावले गेले. महापालिकेत अनेक वर्षांपासून बेकादेशीर रित्या नोकरी करत असलेल्या 17 कर्मचाऱ्यांच्या 2001 पासूनच्या प्रलंबित वेतनाच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी एका नेत्याने माझ्यावर दबाव आणला.

Continues below advertisement

Tukaram Mundhe : मी स्वाक्षरी करण्याऐवजी प्रकरण संशयास्पद वाटल्यामुळे डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावली

मी स्वाक्षरी करण्याऐवजी प्रकरण संशयास्पद वाटल्यामुळे संपूर्ण प्रकरणाची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावली. शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व 17 जणांना बेकायदेशीररित्या मिळवलेल्या नोकरीतून बडतर्फ केले. त्यामध्ये एका स्थानिक आमदाराच्या जवळच्या नातेवाईकाचा ही समावेश होता. त्यामुळे त्या आमदाराने माझ्या विरोधात वारंवार मोहीम उघडली. ज्या प्रकरणातून मला क्लीन चीट आधीच मिळाली आहे, तेच आरोप वारंवार आणि परत परत करून एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा. असा प्रश्न देखील तुकाराम मुंढे यांनी विचारला.

तुकाराम मुंढेंना आयुक्तांनी क्लीन चीट दिलीय हे रेकॉर्डवर आहे : विजय वडेट्टीवार

तुकाराम मुंढे हे प्रामाणिक आहेत की नाही, ते इमानदार आहेत की नाही. नागपूर महापालिकेत असताना तुकाराम मुंढेंना आयुक्तांनी क्लीन चीट दिलीय हे रेकॉर्डवर आहे. महिला आयोगाकडेही तक्रार झाली होती, पण ज्या महिलेनं तक्रार केली त्या महिलेवरच महिला आयोगाने दंड लावला, हे बघून घ्या. केंद्रीय महिला आयोगानेही क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे, तुकाराम मुंढे यांच्यावर जे आरोप झाले आहेत, ते कोणाच्या स्वार्थापायी झाले आहेत. मुख्यमंत्र्‍यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, सत्य परिस्थिती तपासून, काही चूक असेल तर कारवाई करावी. पण, निर्दोष असतील तर कुठल्याही दबावाखाली ही कारवाई होऊ नये, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. 

हेही वाचा