मुंबई : पोलीस (Police) म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दिसते ती खाकी वर्दी (Khaki Police Uniform)... पोलिसांच्या भीतीने गुन्हेगार थरथर कापतात. गुन्हेगार कितीही शिताफीने गुन्हा करण्याचा प्रयत्न करत असले तरी, पोलीस मात्र, आपली जबाबदारी चोख पार पाडतात आणि खाकीची खरी 'पावर' दाखवतात. भारतात पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकी असतो. पण, तुम्ही कधी विचार केलाय की, पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकीच का असतो? काळा, लाल किंवा इतर का नाही. यामागचं कारण जाणून घ्या.


भारतात देशातील बहुतेक राज्यील पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकी असतो. हा रंग आणि यामागचं खरं कारण आणि गणवेशाच्या रंगामागचा इतिहास काय जाणून घ्या.


सुरुवातीला खाकी नाही 'या' रंगाचा होता गणवेश


भारतीय पोलिसांची ओळख म्हणजे खाकी वर्दी. देशात बहुतेक सर्व राज्यांची पोलीस खाकी रंगाचा गणवेश घालते. फक्त पश्चिम बंगालमधील कोलकाता पोलीस वगळता इतर सर्वत्र पोलिसांचा गणवेश खाकी रंगाचाच असतो. पोलिसांच्या गणवेशाचा रंग सुरुवातीपासूनच खाकी नव्हता. पोलिसांच्या गणवेशाचा संबंध इंग्रजांच्या काळापासून आहे. इंग्रज जेव्हा भारतात आले, तेव्हा भारतीय पोलिसांचा गणवेश खाकी नाही तर पांढरा होता. पांढऱ्या रंगाचा गणवेश वापरणं सोयीस्कर नव्हतं कारण, काम करताना हा गणवेश सहज खराब व्हायचा. त्यामुळे पोलिसांना हा गणवेश वापरताना अडचणी यायच्या.


पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकी का असतो? 


त्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या गणवेशाचा रंग बदलण्याची योजना आखली. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी चहाच्या पानांचा वापर करुन एक रंग तयार केला. या रंगाला 'खाकी' नाव दिलं. हा रंग बनवण्यासाठी सुरुवातीला चहाच्या पानांचा वापर केला जायचा, मात्र आता सिंथेटिक रंग वापरले जातात. त्यानंतर पोलिसांच्या गणवेशाचा रंग पांढराऐवजी बदलून खाकी करण्यात आला. खाकी रंग हा हलका पिवळा आणि तपकिरी रंग यांचं मिश्रण आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपूर्वी, 'नॉर्थवेस्ट फ्रंटियर'च्या गव्हर्नरचे एजंट सर हेन्री लॉरेन्स यांनी 1847 मध्ये पोलिसांनी खाकी रंगाचा गणवेश परिधान केल्याचं पाहिलं त्यानंतर पोलीस गणवेशासाठी अधिकृतपणे खाकी रंग स्वीकारण्यात आला. अशाप्रकारे भारतीय पोलीस खात्याचा अधिकृत गणवेश 'पांढऱ्या' रंगावरून 'खाकी' रंग झाला, हा रंग आजही वापरला जात आहे. 


कोलकाता पोलिसांचा गणवेश पांढऱ्या रंगाचा का असतो?


कोलकाता पोलिसांनी गणवेशाचा रंग बदलण्याचा ब्रिटीशांचा निर्णय मान्य केला नाही. कोलकाता शहर समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. त्यामुळे येथील हवामान वर्षभर उष्ण आणि दमट असते. अशा स्थितीत पांढऱ्या रंगाचा पोलिसांचा गणवेश सर्वोत्तम आहे. कारण पांढऱ्या रंगामध्ये तुम्हाला अधिक उष्ण वाटत नाही आणि शरीराचं तापमान कमी राखण्यास मदत होते. कोलकाता पोलिसांना काम करता उष्ण वाटू नये म्हणून त्यांच्या गणवेशाचा पांढरा रंग कायम ठेवण्यात आला. कोलकाता पोलीस वगळता पश्चिम बंगाल राज्यातील इतर पोलिसांच्या गणवेशाचा रंगही खाकी आहे.