कोल्हापूर : बड्या अधिकाऱ्यांचे हनी ट्रॅपप्रकरण चर्चेत असातनाचा आता कर्नाटकात (Karnatak) पुन्हा एकदा कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कुठलाही राजकारणी नसून, चक्क डीजीपी दर्जाचे आयपीएस अधिकारी डॉ. रामचंद्रराव (IPS) यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात येत आहे. महिलांसोबत आक्षेपार्ह वर्तन करतानाचा त्यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हा व्हिडिओ (Viral video) डीजीपी कार्यालयातच चित्रीत झाल्याचा आरोप आहे. या घटनेनं सोशल मीडियात आणि कर्नाटकात खळबळ उडाली असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही दखल घेत याप्रकरणाची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यालयीन वेळेत व कर्तव्यावर असतानाच डॉ. रामचंद्रराव यांनी महिलांसोबत अनुचित वर्तन केल्याचे व्हिडिओत दिसत असल्याचा दावा केला जात आहे. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कपड्यांमध्ये महिला कार्यालयात आल्यावर त्यांना मिठी मारणे व चुंबन घेणे असे प्रकार कथितरित्या या व्हिडिओत दिसत आहेत. हा व्हिडिओ गुप्त कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्ड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे पोलिस दलाच्या शिस्तीवर, प्रतिष्ठेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संबंधित महिलांवर कोणतीही जबरदस्ती झाल्याचा आरोप नसला, तरी कार्यालयीन वेळेत, पोलिस गणवेशात अशा प्रकारचे वर्तन केल्याबद्दल तीव्र टीका होत आहे. सध्या डॉ.रामचंद्रराव हे नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे डीजीपी म्हणून कार्यरत आहेत. मात्र, या कथित व्हिडिओ प्रकरणाची दखल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतल्याची माहिती आहे. संबंधित अधिकाऱ्याबाबत मुख्यमंत्री नाराज असल्याचेही समजते. दरम्यान, या प्रकरणी राज्य सरकार कोणती कारवाई करणार, चौकशीचे आदेश दिले जाणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल - सिद्धरामय्या
डीजीपी रामचंद्र राव यांचा अश्लील व्हिडिओ प्रकरणाची सखोल चौकशी करुन कोणतीही तडजोड न करता कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. डीजीपी रामचंद्र राव यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती सकाळी मिळाली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून कोणतीही तडजोड न करता कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगावात सांगितले. सोमवारी खानापूर तालुक्यातील नंदगड येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कोणताही शासकीय अधिकारी असो किंवा कितीही मोठी व्यक्ती असो, कायद्याप्रमाणेच कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
हेही वाचा
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
