Electric Cable Fell on TC : रेल्वे प्लॅटफॉर्मवर (Railway Platform) उभ्या असलेल्या तिकीट तपासनीसाच्या (TC) डोक्यावर अचानक हायव्होल्टेज विजेची तार (Highvoltage Electric Cable) पडली. यामुळे टीसीला जोरदार विजेचा झटका (Electric Shock) बसला आणि तो दूर फेकला गेला. पश्चिम बंगालच्या (West Bengal) मेदिनीपूर जिल्ह्यामधील खरगपूर (Kharagpur) रेल्वे स्थानकावरील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली. अचानक विजेची तार पडून टीसीला विजेचा धक्का लागल्याने रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली.
पश्चिम बंगालमधील खरगपूर रेल्वे स्थानकावर टीसी सुजान सिंह आपल्या एका दुसऱ्या टीसी सहकाऱ्यासोबत प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर उभे होते. प्लॅटफॉर्मवरील फूट ओव्हर ब्रिजजवळ उभ्या असलेल्या या दोघांमध्ये संवाद सुरु होता. यावेळी अचानक उच्च दाब असलेली विजेची तार सुजान सिंह यांच्या अंगावर पडली.
विजेचा धक्का लागताच रेल्वे रुळावर पडला टीसी
उच्च दाबाची विजेची तार अंगावर पडून टीसी सुजान सिंह यांना जोरदार धक्का बसला आणि ते तोल जाऊन रेल्वे रुळावर पडले. यामुळे सुजान सिंह यांना डोक्यावर आणि शरीरावर इतर भागांवर गंभीर दुखापत झाली. या दुर्घटनेत जखमी झालेले टीसी सुजान सिंह यांच्यासोबत असलेले सहकारी यातून थोडक्यात बचावले.
सुजान सिंह यांच्या सहकाऱ्याने आरपीएफला दुर्घटनेची माहिती देताच त्यांना खरगपूर रेल्वे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. सुजान सिंह यांना गंभीर दुखापत झाली होती. सध्या सुजान सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डॉक्टरांची संपूर्ण टीम त्यांच्या उपचार करत आहे.
ही दुर्घटना काही क्षणात झटकन घडली की कोणालाही काही समजलंच नाही. मात्र, सुजान सिंहसोबत घडलेल्या या घटनेनंतर त्यांचे सहकारी चिंतेत असून ते सुजान सिंह यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याबाबत काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.