नागपूरः जिल्ह्यात दररोज कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत असून रविवारी एकाच शाळेतील 38 विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दुसरीकडे सध्या 39 कोरोना बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आल्याने नागरिकांमध्येही भितीचे वातावरण आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार 68 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. तर जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितसंख्या 1194 वर पोहोचली आहे.


सोमवारी जिल्ह्यात 95 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून यात शहरातील 54 आणि ग्रामीणमधील 41 बाधितांचा समावेश आहे. यापूर्वी बाधितांवर गृहविलगीकरणातच उपचार केले जात होते. मात्र आता कोरोना बाधितांच्या आकडेवारीसह उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात येणाऱ्यांच्याही संख्येत वाढ होत असल्याचे ही बाब चिंतेचा विषय बनली आहे.


या रुग्णांलयांत बाधितांवर उपचार सुरु


रुग्णालयात भरती असलेल्या 39 बाधितांपैकी 14 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात, 2 बाधित मेयोमध्ये, 5 बाधित किंग्सवे हॉस्पिटलमध्ये, 2 बाधित रेल्वे हॉस्पिटलमध्ये, 2 बाधित लतामंगेशकर हॉस्पिटल सीताबर्डी येथे, 2 बाधित गंगा केअर हॉस्पिटलमध्ये, 1 बाधित शुअरटेक हॉस्पिटलमध्ये, 1 बाधित सेंट्रल एव्हेन्यू क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये, 3 बाधित क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये, 2 बाधित वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये, 3 बाधित स्वास्थम हॉस्पिटलमध्ये आणि 2 बाधितांवर मेडीट्रिना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.


टेस्टिंगची आकडेवारी कमी


सोमवारी जिल्ह्यात 422 जणांची आरटीपीसीआर चाचणी झाली. यापैकी फक्त 58 चाचण्या ग्रामीणमध्ये तर 364 चाचण्या 25 लाखांची लोकसंख्या असलेल्या शहरात करण्यात आल्या हे विशेष. दुसरीकडे रॅपिड अॅन्टीजेन चाचण्यांचीही संख्या कमी झाली आहे. सोमवारी ग्रामीणमध्ये फक्त 70 जणांची तर शहरात 513 जणांची रॅपिड अॅन्टीजेन चाचणी करण्यात आली. दररोजच्या तुलनेत ही आकडेवारी कमी आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णसंख्याही कमी होणार हे निश्चितच. मात्र वाढत्या रुग्णसंख्येसह प्रशासनाने टेस्टिंगची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. सध्या शहरातील सक्रिय बाधितांपैकी 1155 बाधित गृहविलगीकरणात आहेत.