Prakash Ambedkar : केसेस काढून घेण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी झाला असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. बदलापूरमधील (Badlapur) कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप, आरएसएसवर जोरदार टीका केली. सोबतच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसह बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.
केसेस काढून घेण्यासाठी अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी
अजित पवारांविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अजित पवार यांचं कौतुक केलं की त्यांनी त्यांच्यावरच्या केसेस काढून घेण्यासाठी शपथविधी करुन घेतला. आपल्या केसेस विथड्रॉ केल्या. केसेस काढून घेतल्यानंतर सरकारमधून बाहेर पडले आणि पुन्हा एनसीपीमध्ये गेले.
राष्ट्रवादीने फसवणूक केली, सरड्यासारखा रंग बदलते
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी आधी शाहू, फुले, आंबेडकरवादी म्हणवत होते आणि आता भाजपसोबत बसत असतील तर त्यांनी इतकी वर्ष फसवलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सरड्यासारखा रंग बदलत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. पूर्वी शाहू, फुले, आंबेडकरवाद्यांचा कलर होता, आता भाजप शिवसेनेचा कलर होतोय की काय अशी चर्चा सुरु झाली आहे, असं आंबेडकर म्हणाले,पूर्वी शाहू फुले आंबेडकरवाद्यांचा कलर होता, आता बीजेपी शिवसेनेचा कलर होतोय की काय अशी चर्चा सुरू झालीये.
वज्रमूठ सभेला जाणार का?, आंबेडकर म्हणतात...
दरम्यान राज्यभरात ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा होत आहे. या वज्रमूठ सभेला जाणार का असं विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे की महाविकास आघाडीसोबत आमचा काही समझौता नाही, संबंध नाही. काँग्रेस आणि एनसीपीने जाहीर केलं आहे की आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत समझौता करु शकत नाही, त्यामुळे त्या सभेचा आणि आमचा काही संबंध नाही."
आता दुसऱ्यांच्या कुबड्या व्हायचं आहे
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील निशाणा साधला. "आरएसएस, बीजेपी हे जोवर वर्चस्ववादी, लोकशाहीविरोधी आणि मनुवाद्यांची भूमिका मांडतेय ती सोडत नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात जे आहेत त्यांना आम्ही मदत करणार," असं ते म्हणाले.
बारसू प्रकल्पाला विरोध!
कोकणातील राजापूरमधील प्रस्तावित रिफायनरीसाठी माती परीक्षण सुरु आहे. बारसू सोलगावमध्ये होणाऱ्या या प्रकल्पाला स्थानिकांचा जोरदार विरोध आहे. सोबतच ठाकरे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला याला विरोध केला आहे. आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील बारसू प्रकल्पाला विरोध केला आहे. आंबेडकर म्हणाले की, "बारसू प्रकल्पाला आमचा विरोध आहे. एन्रॉनलाही विरोध होता, त्यांना घालवण्यामध्ये आमची भूमिका मोठी होती. एकनाथ शिंदेंना इतकंच सांगतो की कोकणाची वाट लावू नका."
'केंद्रातून फोन आले की यांच्या भूमिका बदलतात'
केंद्रातून फोन आले की यांच्या भूमिका बदलतात, असं म्हणत आंबेडकरांनी राज्य सरकारवर शरसंधान साधलं. कोकणात 95 टक्के ऑक्सिजन आहे. तिथे फ्लोरा आणि फोना जन्माला येतो. प्रदूषणमुक्त परिसर असल्यामुळे हे होतं. तो परिसर तसाच राहायला हवा. राहिला कोकणातल्या लोकांच्या जगण्याचा प्रश्न, तर अंतुले जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते म्हणाले की मला पूर्णवेळ मिळाला तर मी कोकणाचा कॅलिफोर्निया करु शकतो. त्यांच्याच काळात गाव तिथे एसटी सुरु झालं. पण नंतर त्यांच्यावर गंडांतर आणून त्यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यात आलं. इंडस्ट्री येऊन कोकणात रोजंदारी वाढेल असं नाही, तर कोकणातील नैसर्गिक संपत्तीचं प्लॅनिंग करुन व्यापार, छोटे उद्योग सुरु केले, तर तेलंगणाप्रमाणे कोकणातही लोकांचं उत्पन्न वाढेल, असं आंबेडकर यांनी सांगितलं.
बाजार समितीचे निकाल हे बदलाचे संकेत आहेत का?
तसंच बाजार समितीत महाविकास आघाडीचीच सत्ता होती, त्यामुळे नव्याने काही आलंय असं मला वाटत नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.