Vasai Virar News : विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी काल चार मित्र समुद्रात बुडाल्याच्या दुर्घटना घडली होती. यामध्ये बेपत्ता असलेल्या आयान झाकीर हुसेन मंडल (वय 19) याचा मृतदेह आज अर्नाळा किल्ला समुद्रकिनारी आढळून आला होता. तर शोएब खान (वय 18) याचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळं शोधमोहीम सुरुच होती. अखेर विरारच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह तब्बल 36 तासांनी सापडला आहे. 

दुसऱ्या तरुणाचा मृतदेह तब्बल 36 तासांनंतर विरारच्या नारंगीत सापडला

विरारच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर बुडालेल्या दोन मित्रांपैकी बेपत्ता असलेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह तब्बल 36 तासांनंतर विरारच्या नारंगी येथील जुली बेटाजवळ आढळून आला. मृताची ओळख शोएब शकीर अहमद खान अशी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच बोळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या या दुर्घटनेत मृतांचा आकडा आता दोनवर पोहोचला आहे. काल सकाळी नालासोपारा पश्चिमेतील चार मित्र समुद्रात उतरले असता समुद्राच्या जोरदार लाटांनी त्यांना ओढले. या घटनेत मोहम्मद साद अफसर खान (16) आणि मोहम्मद अब्दुल हसमुद्दीन शेख (19) यांना पोलीस आणि होमगार्ड जवानांनी धाडसाने वाचवले होते. मात्र आयान आणि शोएब बेपत्ता झाले होते.

पावसाळ्यात समुद्रात उतरण्यास बंदी असूनही सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्दैवी घटना घडली

घटनेनंतर जीवरक्षक, सर्च क्लब, अग्निशमन दल, पोलीस तसेच कोस्ट गार्डने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोधमोहीम राबवली होती. मात्र काल दोघांचाही शोध लागला नव्हता. आज सकाळी आयानचा मृतदेह सापडला होता. मात्र शोएबचा शोध युद्धपातळीवर सुरु होता. अखेर शोएबचा मृतदेह देखील सापडला आहे.  पावसाळ्यात समुद्रात उतरण्यास बंदी असूनही सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे.