Thane Shahapur News : भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 79 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र शहापूर तालुक्यातील आदिवासी कातकरी वस्तीत आजही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. उंभरई गावातील कातकरी वस्तीत स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्यातच मुसळधार पावसात डोक्यावर प्लास्टिक धरून एका ग्रामपंचायत सदस्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

Continues below advertisement

कातकरी वस्तीतील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर 

शहापूर तालुक्यातील उंभरई गावातील ग्रामपंचायत सदस्या जयाबाई महादू वाघ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी कातकरी वस्तीतील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. या वस्तीत स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. अंत्यसंस्काराच्या वेळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र मृत व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी ग्रामस्थांना पावसाची पर्वा न करता अंत्यविधी पार पाडावा लागला. पावसापासून बचाव करण्यासाठी काही ग्रामस्थांनी डोक्यावर प्लास्टिक धरले आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या व्यक्तीला अखेरचा निरोप दिला.

आम्हाला कायमस्वरुपी स्मशानभूमीची जागा मिळावी, ग्रामस्थांची मागणी

पावसात आणि उन्हात अंत्यसंस्कार कुठे करायचे? आम्हाला कायमस्वरुपी स्मशानभूमीची जागा मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शासन आणि प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही कातकरी समाजाला मृत व्यक्तीवर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीसारखी मूलभूत सुविधा मिळत नसेल, तर हा विकासाचा दावा करणाऱ्या व्यवस्थेसमोर गंभीर प्रश्नचिन्ह आहे. उंभरई कातकरी वस्तीसाठी कायमस्वरुपी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आता तरी ठोस पाऊल उचलणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Continues below advertisement

शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर विविध मूलभूत समस्या

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर विविध मूलभूत समस्या आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याचं चित्र देखील समोर आलं आहे. त्याचबरोबर, पक्के रस्ते, घरकुल आणि स्मशानभूमी यांसारख्या मूलभूत सुविधांचा आजही मोठा अभाव आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 79 वर्षे पूर्ण झाली आहेत, तरीदेखील मूलभूत सुविधा पूर्ण झालेल्या दिसत नाहीत. अनेक वाड्यांमधील नागरिकांना व महिलांना आजही मैलोन्मैल दूर चालत जाऊन किंवा डवरे खोदून पाणी आणावे लागत असून, मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत त्यांचा संघर्ष कायम आहे