ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यात जोरदार खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे युवक अध्यक्ष विरु वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉ. .जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, भटकलेले पक्षी पुन्हा आपल्याच घरट्यात परतात; तसेच विरु वाघमारे आणि हेमंत वाणी हे दोघे घरी परतले आहेत. विशेष म्हणजे, विरुला त्याच्या आईनेच परत पाठवल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत जितेंद्र आव्हाड यांना वाढदिवसाची भेट दिली
राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार गटाचे ठाणे शहर युवक अध्यक्ष विरु वाघमारे हे राष्ट्रवादीच्या विभागणीनंतर अजित पवार गटात गेले होते. तर, हेमंत वाणी यांनीही अजित पवार गटाची वाट धरली होती. मात्र, ठाणे शहरातील राष्ट्रवादी (अजित पवार) चे नेतृत्व कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान देत नसल्याचा आरोप करत युवक अध्यक्ष विरु वाघमारे, सरचिटणीस हेमंत वाणी यांनी बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत जितेंद्र आव्हाड यांना वाढदिवसाची भेट दिली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष तथा गटनेते अभिजीत पवार यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
डॉ. जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व
डॉ. जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. शिवाय जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे असल्याने आम्ही स्वगृही परतत आहोत. अखेरीस निजामाच्या तावडीतून सुटका झाली, असे विरु वाघमारे यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून अनेक कार्यकर्ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे युवक अध्यक्ष विरु वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉ. .जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. भटकलेले पक्षी पुन्हा आपल्याच घरट्यात परतात; तसेच विरु वाघमारे आणि हेमंत वाणी हे दोघे घरी परतले आहेत अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानं पवारांच्या राष्ट्रावादीची ठाण्यात ताकत वाढणार आहे.