Thane Mira Road : ठाण्यातील मिरारोड पूर्व भागात हिट अँड रनचा थरार झाला आहे. पेणकरपाडा परिसरात झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाला भरधाव कारने धडक देऊन फरफटत नेत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हिट अँड रन प्रकरणाचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काशीमीरा पोलिसांनी संबंधित कारचालकाला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Continues below advertisement

धनश्याम फुलचंद गुप्ता (वय 30) हे झोमॅटोमध्ये डिलिव्हरीचे काम करतात. 27 जुलै रोजी सकाळी सुमारे 6.50 वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीवरून (एमएच-04 एमएक्स-2364) डिलिव्हरीसाठी जात असताना पेणकरपाडा येथील प्रभाकर म्हात्रे यांच्या बंगल्यासमोरील बीअर शॉपजवळ मागून भरधाव आलेल्या टोयोटा हायराईड कारने (एमएच-01 एफई-5919) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर धनश्याम गुप्ता हे वाहनाखाली फरफटत गेले. या अपघातात त्यांच्या डोक्याला, पाठीला, कंबरेला, हात-पायांना गंभीर दुखापत झाली असून डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. तसेच त्यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेचा एक थरारक व्हिडीओही समोर आला आहे

या घटनेचा एक थरारक व्हिडीओही समोर आला असून, कार बाईकला फरफटत नेत असल्याचे त्यामध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यानंतर या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अपघातानंतर कारचालकाने जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने हा प्रकार हिट अँड रनचा ठरला. घटनेनंतर काशीमीरा पोलिसांनी तपास करून संबंधित कारचालकाचा शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवणे, अपघातानंतर जखमीला मदत न करता पळून जाणे यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास काशीमीरा पोलीस करत आहेत.

Continues below advertisement

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात पिळकोस फाट्यावर मॅक्स गाडी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी प्रतापपूर येथे जात असताना हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत तिघांनाही कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दिनेश गावित आणि कीर्ती गावित या नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मे महिन्यातच दिनेश आणि कीर्ती यांचा विवाह झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे गावित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर त्यांच्यासोबत असलेल्या त्रिशा गावित या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.