Thane News : राज्यात सध्या जोरदार पावसाळा सुरुवात झाली आहे. अशातच अनेक जिल्ह्यांमध्ये खराब रस्ते आणि त्यातील खाड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याचदरम्यान मंगळवारी ठाण्यात खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वराला आपला जीव गमवावा लागला आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवर ही घटना घडली आहे. हा दुचाकीस्वर घोडबंदर रोडवरील काजूपाडा या ठिकाणी बाईकवरुन प्रवास करत असताना खाड्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो रस्त्यावर पडला. त्यानंतर मागून आलेल्या बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याशीच संबंधित बातमी एबीपी माझाने दाखलवली होती. ज्याची दखल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. शिंदे यांनी या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घेतले. तसेच त्यांना या घटनेबाबत विचारणा करून खडेबोल सुनावले. यापुढे अशी एकही घटना घडलेली मला दिसता कामा नये, असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तत्पूर्वी अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले आहेत की, ''वीजपुरवठा अखंडित आणि सुरळीत राहील यासाठी सज्ज रहा. लोकांनी फोन केल्यास त्यांना प्रतिसाद मिळेल याची काळजी घ्या. त्यांची तक्रार नोंदवून घेण्याची 24 बाय 7 व्यवस्था करा. त्यावर कार्यवाही करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी, यंत्रणांना आवश्यक सुविधा, उपकरणे तातडीने पुरवण्यात यावीत.''
शिंदे पुढे म्हणाले की, ''पावसाचा जोर वाढतोय. आपल्या सर्व यंत्रणा सज्ज आहेत. दुर्घटना होऊ नये, पण झाली तर वेळेत प्रतिसाद दिला गेला पाहिजे. जीवितहानी होऊ नये, याकडे आपला कटाक्ष राहीला पाहिजे. केवळ ठाणे जिल्ह्यामध्येच नाही तर राज्यभरातील यंत्रणा आपण सज्ज केली आहे. आपण टिम वर्क सांघिक भावना म्हणून काम केल्यास प्रभावीपणे काम होते. आपआपले काम चोखपणे पार पाडल्यास लोकांमध्ये रोष राहत नाही. शेवटी आपली जनतेशी बांधिलकी आहे. शासन आणि प्रशासन यांनी एकत्रपणे काम केल्यास शासनाविषयी चांगली लोकभावना निर्माण होते. लोकप्रतिनिधी आणि शासन ही दोन्ही चाके समान वेगाने लावल्यास चांगले काम होते. मी स्वतः राज्याच्या जनतेचा लोकसेवक म्हणून काम करतो आहे. आपत्कालीन परिस्थितीत लोकांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे.''
संबंधित बातमी:
Thane News : खड्ड्यांमुळं ठाण्यात दुचाकीस्वराचा मृत्यू , यावर्षीच्या पावसाळ्यात गेलेला पहिला बळी