ठाणे : सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Thane DCC Bank) संचालकपदाच्या निवडणुकीपाठोपाठ आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही महायुतीने बाजी मारली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय चाणक्यनीतीचा मोठा करिष्मा या निवडणुकीत पाहायला मिळाला आहे.

या ऐतिहासिक विजयामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर वर्षानुवर्षे असणारे बहुजन विकास आघाडीचे (BVA) वर्चस्व अखेर मोडीत निघाले असून बँकेची सत्ता आता भाजप-शिवसेना महायुतीकडे आली आहे. बँकेच्या अध्यक्षपदी अरुण बाळू पाटील (Arun Balu Patil) यांची तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री निलेश भोईर (Bhagyashree Nilesh Bhoir) यांची बहुमताने निवड झाली आहे.

बविआचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी शिंदें-चव्हाणांची रणनीती

वास्तविक पाहता, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत 'सहकार पॅनल' विरुद्ध 'परिवर्तन पॅनल' अशी थेट लढत रंगली होती. मात्र, बँकेवर वर्षानुवर्षे पकड असलेल्या बहुजन विकास आघाडीला सत्तेतून बाहेर करण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी एक अजब पण यशस्वी खेळी खेळली होती. त्यांनी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे उमेदवार दोन्ही पॅनलमध्ये उभे केले होते.

या चतुर रणनीतीमुळे निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचे दोन्ही पॅनल मिळून तब्बल १४ उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेमके काय होणार आणि कोणाचा उमेदवार बाजी मारणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर या रंजक राजकीय नाट्याचा शेवट महायुतीच्या विजयाने झाला.

कथोरे-पाटील यांची एकजूट, मात्र शिवसेनेचे एक मत फुटले

अध्यक्षपदाच्या प्रत्यक्ष निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीच्या बाजूने १४, तर बहुजन विकास आघाडीच्या बाजूने ७ उमेदवारांनी मतदान केले. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकलेले भाजपचे खासदार कपिल पाटील (Kapil Patil) आणि आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) या दोन्ही नेत्यांमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीवेळी मात्र एकजूट पाहायला मिळाली. हा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय प्रगल्भतेचा आणि समन्वयाचा मोठा विजय मानला जात आहे.

मात्र, महायुतीसाठी या आनंदात एक चिंतेची बाबही समोर आली आहे. या मतदानादरम्यान शिवसेनेचे एक मत फुटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हा थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अंतर्गत पातळीवर एक मोठा हादरा मानला जात आहे. असे असले तरी, संख्याबळ जास्त असल्याने महायुतीने अरुण बाळू पाटील आणि भाग्यश्री भोईर यांच्या रूपाने बँकेच्या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर आपला कब्जा मिळवला आहे.

ही बातमी वाचा: