Thane Crime: ठाण्याच्या कल्याण अटाळी भागात मौज म्हणून एका लघूपटाचे चित्रीकरण पाहण्यासाठी गेलेल्या 11 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चित्रीकरण पाहण्यासाठी आलेल्या मुलीला या भागातीलच एका दुकारनदाराने जबरदस्ती आपल्या दुकानात बोलावून घेत रात्रभर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नराधमाच्या तावडीतून सुटल्यावर घाबरलेल्या मुलीने आपल्या आईला झाला प्रकार सांगितल्यानंतर आईच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलीला सोबत घेऊन आईने थेट पोलीस ठाणं गाठलं. त्यांनतर मुलगी आणि आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी दुकानदाराविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Crime News)

नक्की घडले काय?

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या कल्याण अटाळी भागात काळू नदीच्या काठी मौज म्हणून एका लघुपटाचे चित्रीकरण पाहण्यासाठी रात्रीच्या वेळेत गेलेल्या एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चित्रीकरण संपल्यानंतर घरी जाऊ न देता या भागातील एका दुकानदाराने जबरदस्तीने आपल्या दुकानात बोलावून घेतले. रात्रभर तिच्यावर दुकानात लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पीडित मुलगी आंबिवली भागात आपल्या कुटुंबीयांसह राहते. ती याच भागातील एका शाळेत शिक्षण घेते. शाळेला सुट्टी असल्याने सोमवारी रात्री 8 वाजता मुलगी आपल्या आईला मी मैत्रिणीच्या घरी जाते असं सांगून मुलगी घराबाहेर पडली होती. त्यानंतर मुलीनं घराच्या परिसरात असलेल्या काळु नदीकाठी एका लघुपटाचे सुरू असलेले चित्रीकरण पाहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. चित्रीकरण पाहत असताना त्या भागात एका दुकानदाराचे दुकान होते. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दुकानदाराने पीडित मुलीला आपल्या दुकानात बोलावून घेतले. मुलगी दुकानात येताच दुकानदाराने दुकानाचे मुख्य लोखंडी दार बंद करून घेतले.मुलीने घरी जायाचे आहे, असे दुकानदाराला सांगितले. दुकानदाराने तिला दुकानात जबरदस्ती थांबून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. 

नराधमावर गुन्हा दाखल

मैत्रिणीकडे जाते सांगून गेलेली मुलगी रात्रभर घरी कशी आली म्हणून पीडित मुलीचे रात्रभर कुटुंब रात्रभर अटाळी, आंबिवली भागात शोध घेत होते. ती आढळून आली नाही. सकाळच्या वेळेत पीडितेचे कुटुंबीय शोध घेत असताना त्यांना मुलगी घराच्या परिसरात आढळून आली. तातडीने मुलीला घेत कुटुंबियांनी घर गाठले. मुलीने झाला प्रकार आईला सांगितल्यानंतर संपूर्ण कुटुंब हादरले. घटना घडल्यानंतर मुलीला घेऊन आईने जवळचे पोलीस ठाणे गाठले. मुलीच्या आणि आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दुकानदाराविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा:

धक्कादायक! विठोबाच्या पंढरीत अल्पवयीन हातात गावठी पिस्तूलासह जिवंत काडतूसं! खून करण्यासाठी निघाले तेवढ्यात..