ठाणे : जिल्ह्याच्या भिवंडी येथे नाशिक महामार्गावरील खड्ड्यात बुलेट आदळल्याने ठाणे येथील टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्युनंतर सर्वत्र हळहळ आणि संतापही व्यक्त झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी देखील खड्ड्यामुळे होणारे अपघात (Accident) आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवघेण्या प्रवासावरुन सरकारला लक्ष्य केलं. मात्र, पोलीस प्रशासनाला भिवंडीतील या दुर्घटनेचं गांभीर्य आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भिवंडीतील टीडीआरएफ जवानाच्या अपघातानंतर संबंधित ठेकेदारांवर कारवाईची मागणी करण्यासाठी कुटुंबीयांनी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी (Police) पीडित कुटुंबीयांनाच सुनावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आपल्या मुलाच्या मृत्यूचं दु:ख घेऊन गोरे कुटुंबीय आज पोलीस ठाण्यात गेले होते. याप्रकरणी, संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. मात्र, "तुमच्या मुलालाच खड्डा दिसला नाही का?" असा उलट सवाल पोलिसांनी नातेवाईकांना केला. तक्रार नोंदविण्याऐवजी मृत जवानावरच गुन्हा दाखल करण्याची भाषा पोलिसांनी केल्याचा दावा पीडित कुटुंबीयांकडून केला जात आहे. ठेकेदारांवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून गेलो होतो, मात्र पोलिसांनी उलट आम्हालाच सुनावले, असे विकासच्या काकांनी म्हटलं आहे. तर, याबाबत पोलिसांनी देखील स्पष्टीकरण दिलंय.
नाशिक रोडवर काल सकाळी अपघाताची घटना घडलेली आहे, खड्ड्यामुळे हा अपघात घडला अशी तक्रार दाखल झालेली आहे. मयत व्यक्तीच्या भावाची मी भेट घेतली, पोलीस ठाण्यात मी त्यांच्याशी बोललो. नियमानुसार एडीआर (एफआयआर) दाखल केलेला आहे, त्याची चौकशी तपासाप्रमाणे सुरू आहे, अशी प्रतिक्रिया डी.वाय.एस.पी विशाल नागरगोजे यांनी दिली. तसेच, खड्ड्यामुळे अपघात झालेला असं निष्पन्न झालं तर ठेकेदार आणि संबंधित जबाबदार अधिकारी असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार आहे. एमएसआरडीसी आणि नॅशनल हायवेचे इंजिनियर यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यांच्याबरोबर बैठक देखील आयोजित केलेली आहे. खड्डे देखील तात्काळ गतिमानाने बुजवण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. जी घटना घडली, त्यानंतर तात्काळ शहापूर पोलीस स्टेशन आणि मी घटनास्थळी भेट दिलेली आहे. योग्य पुरावे फोटोग्राफ, व्हिडिओग्राफ आमच्याकडे आहेत, कुठलाही पुरावा नष्ट झालेला नाही, असेही नागरगोजे यांनी स्पष्ट केले. तसेच, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना कोणी असं बोललं असेल तर त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांची चौकशी करू - नागरगोजे
दरम्यान, याप्रकरणी काल एडीआर दाखल केलेला आहे पंचनामा पोस्टमार्टम करून साक्षीदारांची जबब घेण्याचं काम सुरू आहे. नागरिकांना आमचा आव्हान आहे की, ती घटना कोणी पाहिली असेल तर प्रत्यक्षदर्शीनी येऊन आपला जवाब नोंदवावा, असे आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे.
