Dombivli News : वय अवघे सात वर्ष, या वयात मातृभाषेतील मराठी उच्चार देखील बोबडे असतात. मात्र डोंबिवलीच्या (Dombivli) सात वर्षाच्या व्योमने कमालच केली आहे. सात वर्षीय व्योम दाभाडकर याने भगवद्गीतेचे (Bhagavad Gita) सगळे 18 अध्याय, त्यामधील 700 श्लोक शास्त्रशुद्ध उच्चारणासह पूर्ण पाठ केले आहेत. कोणत्याही अध्यायातील कोणत्याही श्लोकाची सुरुवात सांगितली की तो पुढील संपूर्ण श्लोक सांगू शकतो. अगदी मधूनमधून कोणताही श्लोक विचारला तरी व्योम न चुकता सांगतो. व्योमने नुकतेच कर्नाटक शृंगेरी येथे शारदा पिठातील शंकरचार्यांसमोर भगवद्गीता पाठांतर परीक्षेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. शंकराचार्यांच्या हस्ते त्याचा 21 हजार रुपये आणि प्रमाणपत्र  देऊन विशेष गौरव करण्यात आला आहे.


डोंबिवली पूर्व खंबालपाडा येथील अबोली स्टेट सोसायटीत राहणारा व्योम दाभाडकर हा त्याची आई श्रद्धा, बाबा ओंकार, आजी उज्ज्वला आणि आजोबा पद्माकर यांच्यासोबत राहत आहे. सिस्टर निवेदिता इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दुसरीमध्ये तो सध्या शिकतो. व्योमच्या आजीने उज्ज्वला दाभाडकर यांनी त्याला गीता शिकवली आहे. कल्याण येथील श्री गुरु कलम न्यास यांच्यामार्फत त्यांच्या आजी उज्ज्वला दाभाडकर यांनी देखील 2019 साली कर्नाटक शृंगेरी येथे शारदा पिठातील शंकरचार्यांमसमोर भगवद्गीता पाठांतर परीक्षेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकलं होते. उज्ज्वला दाभाडकर यांनी श्री गुरुकुलम् न्यासकडून गीता संथा घेतली आहे. आपली आजी श्लोक म्हणत असल्याचं व्योमने ऐकलं. त्याचं कुतूहल वाढत गेलं. त्याने आजीकडे श्लोक शिकण्यासाठी हट्ट धरला याच दरम्यान आजीचं ऐकून ऐकून वयाच्या चौथ्या वर्षी त्याला श्लोक उच्चारासह पाठ झाले होते. ते त्याने बोलून दाखवले त्यामुळे आजी उज्ज्वला यांनी व्योमला श्लोक शिकवण्याचा निश्चय केला. आपल्या आजीच्या पावलावर पाऊल ठेवून व्योमने देखील गीता पठनातला एक वर्षापूर्वी सुरुवात केली. त्यानंतर त्याने अवघ्या वर्षभरामध्ये गीतेचे संपूर्ण अठरा अध्याय तोंडपाठ केले. या अध्यायामध्ये एकूण 700 श्लोक आहेत. 


अवघ्या सात वर्षाच्या व्योमने भगवद्गीतेचे सगळे 18 अध्याय शास्त्रशुद्ध उच्चारणासह पूर्ण पाठ केले आहेत. कोणत्याही अध्यायातील कोणत्याही श्लोकाची नुसतीच सुरुवात जरी सांगितली की तो पुढील संपूर्ण श्लोक सांगू शकतो. त्यानंतर मागील आठवड्यात कर्नाटक शृंगेरीला ब्रह्मवृंद गुरु यांच्या समक्ष आणि शंकराचार्य यांच्या उपस्थितीत सतराव्या अध्याय एकही चूक न करता संपूर्ण बोलून दाखवला. इतक्या लहान मुलाचे संपूर्ण अध्याय पाठ असल्याने त्याच्या या कामगिरीचे तेथील श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य महासंस्था यांनी विशेष कौतुक करुन त्याला प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे.