ठाणे : मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढवणे, प्रवाशांची सुरक्षा आणि थेट कनेक्टिव्हिटी यांसह प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी ठाणे-मुंबई परिसरातील तब्बल 48 रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली जिमखाना येथे सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत प्रवासी संघटनांनी मुंबई लोकल प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी आणि रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात सविस्तर निवेदन देऊन विविध मागण्या मांडल्या.

Continues below advertisement

प्रवासी संघटनांच्या प्रमुख 5 मागण्या

बैठकीदरम्यान प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी खालील महत्त्वाच्या मागण्यांवर भर दिला,

कळवा–ऐरोली रेल्वे लिंक : कळवा-ऐरोली रेल्वे लिंकचे काम तातडीने पूर्ण करून प्रवाशांना थेट सेवा उपलब्ध करून देणे.

Continues below advertisement

3री व 4थी रेल्वे लाईन : बदलापूर–कर्जत तसेच कल्याण–कसारा मार्गावरील तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईन प्रकल्पांच्या कामाला गती देणे.

शटल सेवा सुरू करणे : ठाणे–कर्जत आणि ठाणे–कसारा दरम्यान प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष शटल सेवा सुरू करणे.

सिग्नल्स व हेडवे सुधारणा : आधुनिक सिग्नलिंग प्रणाली लागू करून लोकल गाड्यांमधील वेळेचे अंतर (Headway) कमी करणे, ज्यामुळे फेऱ्या वाढवता येतील.

थेट कनेक्टिव्हिटी व क्षमता वाढ : दिवा–वसई–पनवेल मार्गावर थेट कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि कल्याण जंक्शनसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पर्यंतच्या पायाभूत सुविधांची क्षमता वाढवणे.

'प्रश्नांचा शासनस्तरावर पाठपुरावा करणार'

प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींचे सविस्तर निवेदन स्वीकारल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी या सर्व मागण्यांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. "रेल्वेची प्रवासी क्षमता वाढवणे, प्रवाशांना अधिक सुरक्षित व थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रलंबित प्रकल्पांना गती देणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व प्रश्नांबाबत शासनस्तरावर आणि रेल्वे प्रशासनाकडे आवश्यक तो पाठपुरावा करून हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील," असे आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिले.

ही बातमी वाचा: