Nalasopara News : नालासोपारा पूर्वमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गालानगर शेजारी असलेल्या नागेला तलावात बुडून 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. सोहेल शेख असं या युवकाचं नाव आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वसई-विरार महानगरपालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

वारंवार लेखी तक्रारी करूनही तलाव परिसरात संरक्षक कठडे बसवले नाहीत, नागरिकांचा आरोप

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नागेला तलावात यापूर्वीही बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वारंवार लेखी तक्रारी करूनही तलाव परिसरात संरक्षक कठडे, इशारा फलक, सीसीटीव्ही कॅमेरे, बचाव साहित्य तसेच सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. नागरिकांनी अनेकदा या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली, मात्र महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतोय

तलावाच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. योग्य नियोजन आणि प्रभावी सुरक्षा व्यवस्था असती, तर हा दुर्दैवी अपघात टाळता आला असता, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या चिमुकल्याचा सर्पदंशामुळे मृत्यू

शहापूर तालुक्यातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या अवघ्या 9 वर्षीय जगन्नाथ दापट या चिमुकल्याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. गावापर्यंत रस्ता नसल्याने कुटुंबीयांना त्याला तब्बल 5 किलोमीटर डोलीतून पायी घेऊन जावे लागले. मात्र रुग्णालय गाठेपर्यंत खूप उशीर झाला आणि उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे आदिवासी भागातील मूलभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ही हृदयद्रावक घटना शहापूर तालुक्यातील दहीगाव ग्रामपंचायत हद्दीतील शिसवली गावात घडली. जगन्नाथ दापट हा इयत्ता चौथीत शिक्षण घेत होता. शनिवारी मध्यरात्री झोपेत असताना त्याला विषारी सर्पाने दंश केला. प्रकृती बिघडताच कुटुंबीयांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र गावापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने त्याला डोलीतून तब्बल 5 किलोमीटर पायी नेण्यात आले. दहीगाव येथील मुख्य रस्त्यावर पोहोचल्यानंतर वाहनाने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत सर्पदंशामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, पण उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी जगन्नाथचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "गावाला रस्ता असता, तर जगन्नाथला वेळेत उपचार मिळाले असते आणि त्याचा जीव वाचू शकला असता," असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही शिसवलीसारखी अनेक आदिवासी गावे आजही पक्क्या रस्त्यापासून वंचित आहेत. एका निष्पाप चिमुकल्याचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.