ठाणे : मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये भारतीय जनता पक्षाने (BJP) स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली असली, तरी विरोधी पक्षांच्या हालचालींमुळे महापालिकेतील राजकारण तापू लागले आहे. काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या नगरसेवकांनी एकत्र येत ‘शहर विकास आघाडी’ स्थापन केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या घडामोडीमुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे.
भाजपकडे सत्ता, पण विरोधकही एकवटले
मिरा-भाईंदर महानगरपालिकेत एकूण 95 निवडून आलेले नगरसेवक असून, नियमानुसार आणखी 5 स्वीकृत नगरसेवक नियुक्त होणार आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपकडे तब्बल 78 नगरसेवक असल्याने सत्ता पूर्णपणे भाजपच्या हातात आहे. मात्र, विरोधी बाजूला काँग्रेसचे 13, शिवसेना शिंदे गटाचे 3 आणि 1 अपक्ष नगरसेवक असे एकूण 17 नगरसेवक आहेत. यापैकी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याने प्रभावी विरोधी गट उभा राहिला आहे.
विरोधी पक्षनेतेपदाचा कायदेशीर दावा
महानगरपालिका नियमांनुसार, सत्ताधारी पक्षाव्यतिरिक्त सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्ष किंवा आघाडीला ‘विरोधी पक्षनेते’ पदाचा अधिकार मिळतो. त्या अनुषंगाने काँग्रेस-शिवसेना (शिंदे गट) यांनी स्थापन केलेली शहर विकास आघाडी ही सध्या महापालिकेतील सर्वात मोठी विरोधी आघाडी ठरत आहे. त्यामुळे या आघाडीला विरोधी पक्षनेते पद, तसेच स्थायी समितीतील सदस्यपद आणि स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा हक्क मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
गटनिहाय नोंदणी आणि घोषणेची प्रतीक्षा
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात गटनोंदणी व गटनेतेपदाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असून, लवकरच महापालिका आयुक्तांकडे अधिकृत नोंद केली जाणार आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेत्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, या आघाडीमुळे आगामी काळात सभागृहात भाजपच्या निर्णयांना संघटित आणि आक्रमक विरोध पाहायला मिळू शकतो.
भाजपाची तीव्र प्रतिक्रिया
दरम्यान, भाजपाने या घडामोडींवर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि काँग्रेसची छुपी युती असल्याचा आरोप आम्ही केला होता, आणि आता तोच आरोप खरा ठरत असल्याचा दावा भाजपाने केला आहे. जनतेसमोर आता विरोधकांचा दुहेरी चेहरा उघडा पडल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. एकूणच, मिरा-भाईंदर महापालिकेत सत्ता भाजपकडे असली, तरी ‘शहर विकास आघाडी’मुळे राजकीय संघर्ष अधिक धारदार होणार हे निश्चित मानले जात आहे.
ही बातमी वाचा:
