Mira Bhayandar Geeta Jain News : मिरा भाईंदर महापालिकेच्या भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात आमदार गीता जैन (MLA Geeta Jain) या पालिका अधिकाऱ्यांवर भडकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता मिरा भाईंदरमध्ये  प्रांतवाद सुरु झाला आहे. या वादात आज ओवळा माजीवाडाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उडी मारली आहे. मराठी नाटक चालू असताना, राजस्थानी समुदायाच्या लोकांनी गोंधळ घालून मराठी नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न केला आणि आमदार जैन यांनी दुसऱ्या समुदायाची बाजू घेवून अधिकाऱ्यावर  भडकल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रताप सरनाईक यांनी याबाबत मिरा-भाईंदर महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लोकप्रतिनीधीना समज द्यावी आणि यापुढे अशी अरेरावी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. यावेळी मराठी नाटकाच्या प्रयोगाला सवलत देणे आणि मराठी नाटकांना प्राधान्य द्यावी अशी मागणी केली आहे.

 

आधीदेखील मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी दोन महिन्यांपूर्वी अनधिकृत बांधकाम तोडणा-या अभियंत्याला थोबाडीत मारल्याची घटना मोबाईल मध्ये कैद झाली होती. त्यावेळी देखील जैन यांच्यावर टीका झाली होती. 

नेमकं काय झालं?


रविवारी 6 ऑगस्ट रोजी राजस्थानी भाषेतील “खाटु श्याम” हे नाटक पालिकेच्या नाट्यगृहात होतं. त्याचवेळी अगोदर मराठी नाटक “करुन गेलो गाव” या नाटकाचा प्रयोग होता. जवळपास महिन्यानंतर मराठी नाटक लागल्याने मराठी रसिकांनी भरभरुन दाद दिली. 'वन्स मोर'मुळे नाटकाला पाऊण तास अधिकचा वेळ लागला. त्यामुळे मराठी नाटकानंतर असलेल्या राजस्थानी भाषेतील नाटकाला उशीर झाला. त्याचाच राग आमदार गीता जैन यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर काढला. जोरजोरात ओरडून अधिकाऱ्याला झापलं. याचा व्हिडीओ व्हायरल झाला.  


सरनाईक यांचा इशारा


याचीच परिणीती आज मिरा भाईंदर मध्ये मराठी-राजस्थानी असा वाद उद्भवला.  यावर प्रताप सरनाईक यांनी उडी घेतली. महाराष्ट्रात मराठी भाषेची गळचेपी, मराठी नाटकांवर अरेरावी कदापि सहन करणार नसल्याच सांगत, मराठी भाषिकांवर अन्याय केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार अशी भूमिका मांडली. 


आमदार गीता जैन यांनी काय म्हटलं?


 याबाबत मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी आपण पालिकेच्या अधिकाऱ्यावर संतापले असल्याचे सांगितले.  दोन कार्यक्रमांचे नियोजन व्यवस्थित का लावले गेले नाही. याचा जाब विचारला असल्याचे सांगितले.  मराठी नाटक वेळेवर आटपलं नाही म्हणून राजस्थानी लोकांमध्ये संताप पसरला होता आणि काही तोड फोड होऊ नये म्हणून आपण एक जनप्रतिनीधी असल्याने तिथे असलेल्या अधिका-याला जाब विचारला असे स्पष्टीकरण दिले. काही नेते नेते जाणून बुजून ह्या घटनेला प्रांतवादाचे स्वरुप देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.


इतर संबंधित बातमी: