Kharegaon Toll Plaza : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका तब्बल 9 वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. 2017 साली बंद करण्यात आलेला हा टोलनाका आता नव्या रस्ते प्रकल्पामुळे पुन्हा उभारला जात आहे. समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या आमने ते ठाणे या दहा पदरी मार्गिकेच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईकडे जाणारा प्रवास वेगवान होणार असला तरी ठाणे, कल्याण, भिवंडी, नवी मुंबई आणि मुंबईकडे येणाऱ्या वाहनचालकांना पुन्हा टोलचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या 23 किमी लांबीच्या प्रकल्पाचं काम 90 टक्के पूर्ण झालं आहे. येत्या काही महिन्यात या मार्गिकेच्या निर्माणाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने होणारा प्रवास वेगवान होणार आहे. मात्र असं असलं तरी वाहनचालकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव इथे असलेला टोलनाका 2017 साली बंद करण्यात आला. मात्र आता समृद्धी महामार्गावर जोडण्यासाठी आमने ते ठाणे असा दहा पदरी रस्ता तयार करण्यात आल्याने पुन्हा एकदा खारेगाव इथे टोलनाक्याची उभारणी सुरू करण्यात आली आहे. या निर्णयाला मनसेने विरोध केला आहे. काहीही झाले तरी टोलनाका उभारू देणार नाही असा पवित्रा मनसेने घेतला आहे. टोलच्या नावाखाली सरकार सामन्यांची लूट करत आहे अशी टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली. त्यामुळे पुन्हा टोल नाका संघर्ष पुन्हा होण्याची शक्यता आहे.
Kharegaon Toll Naka Impact : प्रवाशांवर पुन्हा आर्थिक ताण
या टोलनाक्यामुळे दररोज हजारो वाहनचालकांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागणार आहे. उरण जेएनपीए आणि गुजरातहून येणारी अवजड वाहने तसेच कल्याण-भिवंडीतील स्थानिक वाहतूकही या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करते. त्यामुळे टोलचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे.
MNS On Kharegaon Toll : टोल सुरू होऊ देणार नाही, मनसेचा इशारा
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी खारेगाव टोलनाका सुरू करण्याला विरोध केला आहे. ते म्हणाले की, "निवडणुकीच्या अगोदर मुंबईतील मुलुंड टोलनाका बंद झाला निवडणूक संपल्यानंतर पुन्हा आता खारेगाव टोल सुरू होत आहे. आम्ही कर भरतो तरीसुद्धा टोल घेतात, मग सामन्याचे पैसे जातात कुठे? आधीच मुंबई नाशिक महामार्गावरती तीन टोल नाके आहेत. चौथा खारेगाव टोल होऊन देणार नाही. ठाणेकरांनी एकजूट दाखवली नाही तर येणाऱ्या काळात गल्लीबोळात टोल उभे करतील अशी परिस्थिती उपस्थित होईल. त्यासाठी टोलच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन रस्त्यावरती आले पाहिजे. खारेगाव टोलनाका सुरू होणार नाही हे आम्ही खात्री देतो."
Kharegaon Toll Plaza roject Details : प्रकल्पाची सध्यस्थिती
मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या 23.80 किमी लांबीच्या प्रकल्पाचे सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. समृद्धी महामार्ग भिवंडी (आमणे) येथून या मार्गाला जोडला गेला आहे. भविष्यात ठाणे कोस्टल रोडही या मार्गिकेशी जोडला जाणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे.
- साकेत पूल आणि खारेगाव खाडी पूल सुरू
- वडपे उड्डाणपूल लवकरच सुरू होण्याची शक्यता
- येवई, वालशिंद, सोनाळे, सरवली पिंपळास येथील भुयारी मार्ग पूर्ण
- रेल्वे पुलाचे काम 71% पूर्ण
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळ 15 वर्षे देखभाल करणार असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल वसुली करणार आहे.
ही बातमी वाचा:
