ठाणे : गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करा आणि शहर स्वच्छतेसाठी उपाययोजना करा अशी मागणी केडीएमसीतील (Kalyan-Dombivli Municipal Corporation) शिवसेनेच्या (Shivsena) नगरसेवकांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे. केडीएमसी मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत आज शहरातील खड्ड्यांवर चर्चा करण्यात आली, त्यावेळी ही मागणी करण्यात आली.


कल्याण डोंबिवलीतील (Kalyan-Dombivli Municipal Corporation) रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. याबाबत आज शिवसेनेच्या (Shivsena) नगरसेवकांची पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीस तीस नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे 24 तास काम सुरू ठेवत खड्डे भरण्याचं काम पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन आयुक्तांनी नगरसेवकांना दिलं. गणेशोत्सवापूर्वी (Ganeshotsav 2022) हे सर्व खड्डे बुजवण्यात येतील असंही आयुक्तांनी सांगितलं.


कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची अक्षरशः चाळण
यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवली परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने (KDMC) सुमारे 15 कोटीच्या निधीची तरतूद केली होती. मात्र पालिकेकडून वरवरचे काम करत खड्डे बुजवले गेल्याची तक्रार करण्यात आली. त्यामुळे तासभराच्या पावसाने पुन्हा खड्डे पडून रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.  


शहरातील पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून सातत्याने खड्डे बुजवून रस्ते सुरू करण्याची मागणी करण्यात येत असली तरी महापालिका प्रशासनाकडून पावसाचे कारण देण्यात येत होतं. त्यामुळे आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तब्बल 30 हून अधिक माजी नगरसेवकांनी, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली.


पालिका आयुक्तांसोबत झालेल्या या बैठकीत नगरसेवकांनी शहरातील रस्ते गणेशोत्सवापूर्वी सुस्थितीत करा, तसेच शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत, स्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे त्याबाबत उपायोजना करा अशी मागणी केली. त्यावेळी पालिका आयुक्तांनी पावसामुळे खड्डे भरण्यात व्यत्यय येत होता, आता पावसाने उघडीप घेतली आहे, खड्डे भरण्याचे काम 24 तास सुरू ठेवत गणेशोत्सवापूर्वी रस्ते सूस्थितीत करण्यात येतील असं आश्वासन दिलं. तसेच स्वच्छतेबाबत देखील उपाययोजना करण्यात येतील असंही आश्वासन दिलं. 


महत्त्वाच्या बातम्या: