KDMC Hospital Doctor: कल्याणमधील केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील धक्कादायक निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. भटक्या कुत्र्याने चावा घेतलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याला रेबीजचे इंजेक्शन देताना सुई (Injection needle) त्याच्या कमरेत अडकून राहिली. मुलाला त्रास सुरू झाल्यानंतर एक्स-रेमध्ये हा प्रकार उघड झाला. अखेर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून सुई बाहेर काढण्यात आली असून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यानिमित्ताने सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयातील भोंगळ कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Health news)

Continues below advertisement

कावेश पांडे  चिमुरडा हा कल्याण पूर्व येथील काका ढाबा परिसरात वास्तव्याला आहे. कल्याण पूर्वेतील अडीच वर्षीय कावेश पांडे याला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रेबीजचे इंजेक्शन दिल्यानंतर सुई शरीरातच राहिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मुलाला त्रास सुरु झाल्यानंतर काढलेल्या एक्स-रेमध्ये सुई कमरेत अडकून असल्याचे समोर आले. त्यानंतर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून सुई बाहेर काढण्यात आली. या घटनेमुळे रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी चौकशीचे आदेश दिले असून इंटर्न डॉक्टरांचा सहभाग होता का, याचाही तपास केला जाणार असल्याचे सांगितले आहे.

कावेशची आई काजल पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पाढा वाचला. आम्ही कावेशला इंजेक्शन देण्यासाठी घेऊन गेलो होतो. इंजेक्शन घेऊन झाल्यावर मुलाच्या कमरेतून सुई बाहेर आली नसल्याचे आम्ही डॉक्टरांना सांगितले. मात्र, डॉक्टरांनी सुई इकडे तिकडे पडली असेल, असे थातुरमातूर उत्तर दिले. तुम्ही मुलाला घरी घेऊन जा. परंतु, प्रत्यक्षात डॉक्टरांनी कावेशला इंजेक्शन देताना सुई इतक्या जोरात कमरेत खुपसली होती की, पूर्ण सुई त्याच्या कमरेत अडकून राहिली. फक्त इंजेक्शनची सिरींज बाहेर आली. मात्र, घरी गेल्यानंतर कावेशला प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यामुळे कावेशचे आई-वडील त्याला घेऊन सायन रुग्णालयात गेले. त्याठिकाणीही रुग्णालयाने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर कावेशला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन त्याच्या कमरेतील सुई  बाहेर काढण्यात आली. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र समोर आले आहे. 

Continues below advertisement

आणखी वाचा

Nagpur Crime: सहा महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भातील बाळासह संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांचा खासगी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप; नागपुरातील खळबळजनक प्रकार