कल्याण डोंबिवलीमध्ये ड्रग्स तस्करांविरोधात कारवाई, 3 जणांना अटक, एमडी ड्रग्ससह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
कल्याण डोंबिवली परिसरातील चरस, गांजा, एमडी यासारख्या नशेच्या पदार्थाची विक्री करणाऱ्या ड्रग्स तस्करांविरोधात कल्याण डोंबिवलीमधील विविध पोलीस ठाण्यांसह डीसीपी स्कॉडने मोहीम तीव्र केली आहे.

Kalyan Dombivli crime news : कल्याण डोंबिवली परिसरातील चरस, गांजा, एमडी यासारख्या नशेच्या पदार्थाची विक्री करणाऱ्या ड्रग्स तस्करांविरोधात कल्याण डोंबिवलीमधील विविध पोलीस ठाण्यांसह डीसीपी स्कॉडने मोहीम तीव्र केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने कारवाई सुरू असून काल दोन विविध ठिकाणाहून एक एमडी तस्करसह 2 गांजा तस्करांना अटक केली आहे. फैजल शेख अफसर शेख अशी दोन गांजा तस्करांची नावे आहेत. तर अब्दुल शेख असे एमडी तस्कराचे नाव आहे.
अब्दुल शेख यांच्याकडून 44 हजार किंमतीच्या एमडी ड्रग्स जप्त करण्यात आला आहे. फैजल शेख व अफसर शेख या दोघांकडून तब्बल 3 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या तिघांनी हे अमली पदार्थ कुठून आणले, कुणाला विक्री करणार होते? याचा तपास पोलीस करत आहे.
काल कल्याण डीसीपी स्कॉड आणि टिळक नगर पोलिसांना 90 फीट रोड कचोरे परिसरात एका इसम एम डी ड्रग्स विक्री साठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत अब्दुल शेख याला बेड्या ठोकल्या आहेत. अब्दुलकडून 22 ग्रॅम वजनाचा सुमारे 44 हजार रुपये किमतीचा एमडी जप्त करण्यात आला आहे. अब्दुल हा रिक्षाचालक आहे. त्याने हे एमडी ड्रग्स कुठून आणले? तो कोणाला विक्री करणार होता? याचा तपास आता पोलीस करत आहेत. तर दुसरीकडे कल्याण एसीपी स्कॉडची गस्त सुरू असताना कल्याण पश्चिमेकडिल चिकन घर परिसरात होली क्रॉस शाळेच्या पाठीमागील मैदानात एका रिक्षामध्ये दोन जण बसले होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या दोघांना हटकले असता या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. डीसीपी स्कॉडच्या पथकाने पाठलाग करत या दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या रिक्षामध्ये तब्बल 6 किलो वजनाचा तीन लाख रुपये किमतीचा गांजा आढळून आला.
पोलिसांनी तत्काळ फैजल शेख आणि अफसर शेख या दोघांना ताब्यात घेतले असून गांजाचा साठा जप्त केला आहे. या दोघांनी इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा कुठून आणला व ते कोणाला विक्री करणार होते याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान एका शाळेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मैदानात सुरू असलेल्या या प्रकारामुळे हे दोघं हा गांजा तस्कर तरुण-तरुण तरुणी सह विद्यार्थ्यांना विक्री करत असल्याचा संशय पोलिसांना आहे पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
























