Kalyan Crime News: कल्याणमधील (Kalyan) वालधुनी परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी (Dowry) सासरच्या मंडळींनी छळाची परिसीमा गाठत एका गर्भवती विवाहितेचे चक्क टक्कल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अमानुष छळातून कशीबशी सुटका करून घेत पीडित महिला सासरहून पळून माहेरी आली असून, सध्या तिच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात (Central Hospital) उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण कल्याण आणि उल्हासनगर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
Kalyan Crime News: लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच छळ सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, अफसाना अन्सारी (Afsana Ansari) असे या पीडित विवाहितेचे नाव असून ती मूळची उल्हासनगरची रहिवासी आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये तिचा विवाह कल्याणच्या वालधुनी परिसरात राहणाऱ्या समीर अन्सारी (Sameer Ansari) याच्यासोबत झाला होता. लग्न करताना मुलीच्या माहेरच्यांनी आपली हुंडा देण्याची परिस्थिती नसल्याचे सासरच्यांना आधीच स्पष्ट केले होते. मात्र, तरीही लग्न पार पडल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी अफसानाचा छळ करण्यास सुरुवात केली.
Kalyan Crime News: गरम पाण्याने हात जाळले, गर्भवती असतानाही ठेवले उपाशी
पीडित महिला गर्भवती असतानाही तिला सासरच्यांकडून जेवण दिले जात नव्हते. घरातील शिल्लक जेवण मुद्दाम फ्रिजमध्ये कुलूप लावून ठेवले जायचे. अमानुष मारहाण करणे, कोणतीच वस्तू किंवा वैद्यकीय उपचारांसाठी पैसे न देणे, इतकेच नव्हे तर गरम पाण्याने तिचे हात जाळण्याचे क्रूर कृत्यही सासरच्यांनी केले. माहेरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे पीडित महिलेने हा सगळा त्रास गुपचूप सहन केला.
Kalyan Crime News: 'डोक्यात उवा झाल्या'चे कारण सांगून केले टक्कल
सासरच्यांचा छळ एवढ्यावरच थांबला नाही, तर 7 जून रोजी क्रौर्याचा कळस गाठला गेला. 'तुझ्या डोक्यात उवा झाल्या आहेत', असे खोटे कारण पुढे करत सासरच्यांनी जबरदस्तीने अफसानाचे टक्कल केले. हा अपमान आणि अमानुष छळ असह्य झाल्यामुळे महिलेने सासरच्यांच्या तावडीतून कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि ती घरातून पळून थेट आपल्या बहिणीकडे गेली. तेथून तिने आपला भाऊ नीर हसन अन्सारी याला फोन करून संपूर्ण आपबिती सांगितली. भावाने तातडीने बहिणीची ढासळलेली प्रकृती पाहून तिला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
Kalyan Crime News: कठोर कारवाईची मागणी
क्रौर्याची सर्व परिसीमा ओलांडणाऱ्या या गंभीर प्रकरणाची आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि पीडित महिलेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सामाजिक स्तरातून होत आहे. सासरच्या नराधमांवर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कुटुंबाने केली आहे. याप्रकरणी सध्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
