Kalyan Accident : दादा, माझ्या आईला उठवा ओ! रक्ताने माखलेल्या अवस्थेत मुलाची आर्त हाक, कल्याणच्या अपघातातील काळीज सुन्न करणारा प्रसंग
Kalyan Accident : कल्याणच्या गांधारी पुलावर मंगळवारी भरधाव वेगात असलेल्या हायवा ट्रकने रिक्षाला जबर धडक दिली. धडकेनंतर ट्रकने पुलाचे कठडे तोडले आणि तो थेट उल्हास नदीत कोसळला.

Kalyan Accident : कल्याणच्या गांधारी पुलावर (Gandhari Bridge Accident) मंगळवारी (दि. २०) एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या हायवा ट्रकने रिक्षाला जबर धडक दिली. धडकेनंतर ट्रकने पुलाचे कठडे तोडले आणि तो थेट उल्हास नदीत कोसळला. या अपघातात रिक्षामधील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सुरुवातीला ट्रकचा चालक आणि त्याच्यासोबत असलेली एक व्यक्ती ट्रकमध्ये अडकली असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, नंतर समोर आलेल्या माहितीनुसार ट्रक चालक सुखरूप असून तो पोलिसांच्या (Police) ताब्यात आहे. दरम्यान, अपघातानंतर गांधारी पुलावर हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या अवस्थेत मुलगा आपल्या आईसाठी आर्त हाक देत होता. परंतु, त्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेक नागरिकांनी मदतीसाठी पुढे येण्याऐवजी मोबाईलवर फोटो आणि व्हिडिओ काढण्यातच अधिक रस घेतल्याचे दुर्दैवी चित्र दिसून आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी सुमारे सहा ते सात वाजण्याच्या सुमारास रिक्षाचालक निलेश वानखेडे आपल्या आईसोबत रिक्षातून बापगावहून कल्याणकडे निघाले होते. प्रवासादरम्यान गांधारी पुलावर त्यांच्या रिक्षाला भरधाव हायवा ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात निलेश यांच्या आई मंगल वानखेडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर निलेश वानखेडे गंभीर जखमी झाले आहेत.
ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात
अपघात इतका जबरदस्त होता की रिक्षा अक्षरशः चुरडून गेली. हायवा ट्रकने धडक दिल्यानंतर तो पुलाचा कठडा तोडून थेट उल्हास नदीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच कल्याण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. तर ट्रकचा चालक आणि त्याच्यासोबत असलेली एक व्यक्ती ट्रकमध्ये अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार ट्रकचा चालक सुखरूप असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
रक्ताने माखलेल्या अवस्थेत मुलाची आर्त हाक
तर, रिक्षाचालक निलेश वानखेडे हे गांधारी पुलावर गंभीर जखमी झाले. तर त्यांच्या आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या अवस्थेत मुलगा निलेश वानखेडे हे आपल्या आईसाठी आर्त हाक देत ते. दादा, माझ्या आईला उठवा ओ, असे तो तेथील उपस्थित नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्या क्षणी घटनास्थळी असलेल्यांपैकी अनेक जण मदतीसाठी पुढे येण्याऐवजी मोबाइलमध्ये फोटो आणि व्हिडीओ घेण्यातच मग्न असल्याचे पाहायला मिळाले.
आणखी वाचा
























