Thane : ठाण्यातील (Thane) माजीवाडा इथं धक्कादायक घटना घडली आहे. येथील वसंत लॉन्स 'सवाना टॉवर' या 23 मजली इमारतीच्या 21 व्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने कुमुधा रमेश शेट्टी (77) या वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी 3 वाजून 45 मिनीटांच्या सुमारास घडली आहे.
वर्तक नगर पोलीस पुढील तपास करत आहेत
आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गॅलरीत उभ्या असलेल्या कुमुधा शेट्टी यांचा अचानक तोल गेल्याने त्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील पोडियमच्या सज्जावर येऊन पडल्या. घटनेची माहिती मिळताच वर्तक नगर पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी हायड्रोलिक, रेस्क्यू वाहनांसह घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी सज्जावरून मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला असून वर्तक नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
ठाण्यात वागळे इस्टेटमध्ये घराची भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील अंबिका नगर क्रमांक १ मधील एका चाळीतील घराची भिंत बुधवारी दुपारी कोसळली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.स्थानिक भालचंद्र पष्टे यांच्या तळ अधिक एक मजली घराची भिंत दुपारी १ च्या सुमारास अचानक ढासळली. माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत काम सुरू केले. सुरक्षेचा उपाय म्हणून परिसराचा वीजपुरवठा खंडित करून धोकादायक भाग हटवण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने करण्यात आले. खबरदारी म्हणून बाधित कुटुंबाची तात्पुरती सोय नातेवाइकांकडे करण्यात आली आहे.
कोरची-कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील बेडगाव घाटात बुधवारी भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी
कोरची-कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील बेडगाव घाटात बुधवारी भीषण अपघात घडला. छत्तीसगडहून कुरखेडाकडे येणाऱ्या मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या SUV कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. या अपघातात आणखी दुसरी कारही दुर्घटनाग्रस्त झाली, तर ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. सुदैवाने एवढ्या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारमधील माणिक मेश्राम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.