Dombivli News : शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी डोंबिवलीच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी रमेश म्हात्रेसह इतर सर्व आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, जामीन मिळवण्यासाठी रमेश म्हात्रेचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच तपास अद्याप बाकी असल्याने तत्काळ जामीन देता येणार नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळं डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रेचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. 

आरोपींची ओळख परेड, साक्षीदारांचे जबाब तसेच आवाजाचे नमुने घेणे अद्याप बाकी असल्याने जमीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.  सुनावणी सहा ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी रमेश म्हात्रेला 9 जुलैला अटक झाली होती.

मुंबई उच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय?

आधी डॉक्टरांना मारहाण करायची आणि मग प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मागण्याच्या रमेश म्हात्रेच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तुम्ही मतदारांकडे जाता आम्हाला तुमची सेवा करायची आहे, म्हणून मत मागता आणि निवडून आल्यावर मारहाण करता असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेला कानपिचक्या दिल्या आहेत. लोक तुम्हाला मते देऊन निवडून आणतात आणि निवडून आल्यावर फाईल आणि खुर्च्यांनी त्यांची डोकी फोडता, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने असं वागायचं का? असा सवाल देखील मुंबई उच्च न्यायालयाने नगरसेवक रमेश म्हात्रेला केला आहे. 

डॉक्टरांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेनंतर तणाव वाढला होता. एका महिला डॉक्टरसह नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा या चौघांवर आरोप आहे. या प्रकरणात डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांना अटक केली. मारहाणीचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात घडलेल्या या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आधी तिघांना अटक केली. मात्र, विरोधकांनी संताप व्यक्त केल्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रेलाही अटक करण्यात आली.

रमेश म्हात्रेवर हत्येचा प्रयत्न आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल 

डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण करणारे शिंदे गटाचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रे याचा भूतकाळ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ज्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर रमेश सुकऱ्या म्हात्रे (Ramesh Mhatre) याने हल्ला केला आहे, त्याच वैद्यकीय क्षेत्राने म्हात्रेला दोनदा जीवदान दिले होते. होय, तुम्ही बरोबर ऐकताय! हत्येचा प्रयत्न आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले 'बाहुबली' राजकारणी रमेश म्हात्रे याच्यावर 2008 मध्ये जीवघेणा गोळीबार झाला होता. त्या वेळी शर्टच्या खिशातील पेनाने गोळी अडवली, पण ती पोटात घुसली. मृत्यूशी झुंज देत असताना डोंबिवलीच्या एका खाजगी रुग्णालयातील डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून म्हात्रेंचे प्राण वाचवले होते. इतकंच नाही, तर त्याआधी झालेल्या एका हल्ल्यात म्हात्रेची किडनी निकामी झाली असताना, याच डॉक्टरांनी त्यांची एक किडनी काढून त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते. डॉक्टर शिरोडकरांना समोर पाहिल्यावर 'बाहुबली' म्हात्रे कृतज्ञतेपोटी थेट पाया पडायचे. मात्र, आज त्याच डॉक्टरांच्या सहकाऱ्यांवर हात उचलल्याच्या घटनेने म्हात्रे तुरुंगाच्या उंबरठ्यावर आहेत.