नवी मुंबई : केंद्र सरकारने नवी मुंबई (Navi mumbai) विमानतळास लोकनेते स्व. दिबा पाटील यांचे नाव देण्याचे जाहीर केल्यानंतर आता स्थानिक भूमिपुत्र आगरी असतानाच आता यावरून नव्या श्रेयवादाच्या लढाई सुरू झाली आहे. विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी आपणच सर्वप्रथम लोकसभेत केल्याची आठवण करून देत, राज्य व केंद्र सरकार नाव देण्यासाठी सकारात्मक असताना विरोधक श्रेयवादासाठी आटापिटा करीत असल्याचा आरोप माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी केला आहे. तसेच, केवळ 2 हजार कारचा सहभाग असलेली कार रॅली काढून नाव देता आले असते तर मी 12 हजार कारची रॅली काढेल, अशी बोचरी टीकाही कपिल पाटील यांनी नाव न घेता विद्यमान खासदार बाळ्या मामा यांच्यावर केली आहे. त्यानंतर, सुरेश म्हात्रे यांनीही पलटवार केला आहे.
लोकसभेत मी 2015 मध्ये मी सर्वप्रथम मागणी केली होती, त्यानंतर दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय संघर्ष समिती बनवून अनेक आंदोलन या मागणीसाठी झाली आहेत. भूमिपुत्रांच्या मागणीनंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला निर्णय मागे घेऊन स्व. दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी भाग पाडले. त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली आहे, असे कपिल पाटील यांनी म्हटले. तसेच, दिबा पाटील यांचे नाव विमानतळास देणे हे सर्वांच्यां प्रयत्नांचे यश आहे, त्याचे श्रेय कोणी एकट्याने घेऊ नये. कोणी प्रयत्न करतो त्याचे अभिनंदन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. तरी काहींना राजकारण करण्याची घाई असते त्यांना त्यांचे लखलाभ असा टोलाही कपिल पाटील यांनी विद्यमान खासदारांना लगावला.
सुरेश म्हात्रेंचा कपिल पाटलांवर पलटवार
2015 पासून कपिल पाटील यांनी कोणाला आणि कोणतं पत्र दिले, कोणते आंदोलन केले असा सवाल उपस्थित खासदार सुरेश म्हात्रे यांनी उपस्थित केला. तसेच, कपिल पाटील यांनी थातूरमातूर कारण सांगणं बंद करावे. लोकसभेत आवाज उठवला म्हणजे होत नाही. मी पण आवाज उठवला, त्यानंतर गप्प बसलो नाही, सातत्याने पत्रव्यवहार केल्याचेही म्हात्रे यांनी म्हटले. 4 जूनच्या रॅलीत गेलो तेथे हे कोणीही महाभाग नव्हते. म्हणून मी पुढील आंदोलनाची दिशा ठरवत कार रॅली आंदोलन केले. पत्र देऊन गप्प बसणे म्हणजे पाठपुरावा नव्हे, असे सांगत कृती समितीला माझा विरोध नाही, त्यांनी आंदोलन करावे मी त्यात सहभागी होईल. नामकरणासाठी कोणता आदेश काढला आहे का? असा प्रश्नदेखील खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी उपस्थित केला.
हेही वाचा
अंगावरचं पांघरुन सुद्धा गेलं, काहीच राहिलं नाही; पुरामुळे शाळेत स्थलांतरीत, आजी-आजोबानं फोडला टाहो