ठाणे : जिल्ह्याच्या शहापूर (Bhiwandi) तालुक्यातील बामणे गावातील रहिवासी विकास लहू गोरे याचा मुंबई नाशिक महामार्गावरील भारंगी नदीच्या पुलाजवळ खड्ड्यामुळे अपघात झाला. टीडीआरएफ जवान विकास गोरे (३१) वर्ष असे त्याचे नाव असून दोन वर्षांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. त्यांना एक वर्ष तीन महिन्याच्या दोन जुळ्या मुलीही आहेत. दररोज प्रमाणे ते आपले कर्तव्य बजावण्यासाठी कामावर निघाले होते. मात्र, मुंबई नाशिक महामार्गावर ठाण्याचे दिशेने जात असताना शहापूर येथील भारंगी नदीच्या पुलाजवळ खड्ड्यामध्ये त्यांची दुचाकी आदळली आणि ते घसरत डिव्हायडरला जाऊन धडकले. या अपघातात (Accident) त्यांना गंभीर दुखापत झाली स्थानिकांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात नेलं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर बोलताना मृत विकास गोरे यांच्या पत्नी कविता गोरे यांनी म्हटले की, माझ्या पतीचा जीव खड्ड्याने घेतला मला अजून काही समजत नाही. या दोन लहान मुलींना मी कसं सांभाळू, प्रशासनाने या दोन मुलींसाठी काहीतरी मदत केली पाहिजे. विकास म्हणाले होते की मुलीची तब्येत बरोबर नाही, आपण तिला दवाखान्यात घेऊन जाऊ, मी काम करून येतो मग मुलीला दवाखान्यात घेऊन जाऊ. परंतु, त्याआधीच त्यांच्या अपघाताची बातमी घरात आली. या घटनेने गोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर, विकासच्या आई कुंदाबाई यांनी प्रशासनाला दोषी ठरवत या खड्ड्यामुळेच माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याचं म्हटलं. तसेच, प्रशासनाने तात्काळ हे खड्डे दुरुस्त करावे, त्यांच्या मुलींचा भविष्याचा विचार करावा व नोकरी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांचे रडून हाल झाले आहेत.
स्थानिक व वर्ग मित्रांकडून हळहळ
विकास हा सर्वांना सांभाळून घेणारा होता, तो लहान मुलांना प्रोत्साहन द्यायचा. घडलेली घटना ही अतिशय दुःखद असून सरकार खड्ड्यांमुळे अजून किती जणांचा बळी घेणार आहे. शहरात किंवा ग्रामीण भागात जिथे आपात्कालीन परिस्थिती असेल तिथे प्रथम मदत करण्यास पोहोचत असे. एवढेच नव्हे तर त्याच्या वर्ग मित्रांनी सांगितले की, तो सगळ्यांना चांगली शिकवण द्यायचा, त्याच्यासमोर गावातील तरुण मुलं व्यसन करत नसत. त्याने आतापर्यंत अनेकांचे जीव वाचवले आहेत. परंतु, प्रशासनाच्या भोंगळ कारभार आणि हलगर्जीपणामुळे आज आमच्या जिवलग मित्राला गमावला आहे, अशी प्रतिक्रिया विकासच्या वर्गमित्रांनी दिली.
विकास हा ठाणे आपत्ती प्रतिसाद दलामध्ये 2019 पासूनचा कार्यकर्ता आहे. 2024 साली परमनंट झाला असून त्याची कामगिरी अतिशय चांगली होती. नुकताच भिवंडी येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत 10 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात त्याने मोलाची कामगिरी केली होती. मात्र, मुंबई नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघात अतिशय दुर्दैवी असल्याचे TDRF ऑफिसर ऑफिसर सचिन दुबे यांनी सांगितले.
महापौर शर्मिला पिंपळोलकर काय म्हणाल्या
विकास लहू गोरे हे टीडीआरएफचे जवान होते, ते शहापूरवरुन ठाण्यात कामावर येत असताना खड्ड्यांमुळे त्यांचा दुर्दैवी अपघात झाला. ठाणे महानगरपालिकेकडून अशा ज्या घटना होतात, त्या कर्मचाऱ्यांसाठी उपाययोजना केलेली आहे. त्यानुसार, इन्शुरन्सच्या अंतर्गत 25 लाख रुपये देणार आहोत, त्याबद्दलची चर्चा आयुक्त आणि माझ्यासोबत होणार आहे. तसेच, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कामावर रुजू करण्यात येईल, असे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले. ठाणे महानगरपालिकेत खड्या संदर्भात पुन्हा एकदा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. दोन-तीन महिने अजून पाऊस संततधार असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या सर्व खड्ड्यांची पाहणी करून सगळे खड्डे भरण्याच्या आदेश दिले आहेत. या खड्ड्यांमुळे कोणाचा मृत्यू होऊ नये. यासाठी महानगरपालिका खबरदारी घेत आहोत, असेही महापौरांनी म्हटले.
