बीड : भिवंडीतील (Bhiwandi) कोहिनूर इमारत दुर्घटनेत (Building collapse) 10 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावावा लागला. त्यामध्ये, उत्तर प्रदेशातील एकाच गावातील 4 जणांचा दुर्दैवी अंत झाला असून त्यामध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. एकाच गावातील आणि नातलग असलेल्या चारही जणांचे मृतदेह आता त्यांच्या उत्तर प्रदेशातील मूळ गावी न्यायचे आहेत. मात्र, पीडित कुटुंबांचे घरातील कर्तेच गेल्यामुळे आता मृतदेह देण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत, अशी मन हेलावणरी ही सत्यस्थिती आहे. याचप्रमाणे या दुर्घटनेत कित्येक कथा आहेत, ज्यांमुळे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. जणू कुणाचं मरणच तिथं लिहिलं होतं की काय, असंही इथं पाहायला मिळाल. तर, जीव वाचविण्याच्या आकांताने उडी टाकलेल्या दोघांचा जीव वाचला. मात्र, त्यांना आपले पाय गमवावे लागले आहेत. 

भिवंडी दुर्घटनेत पत्नीला औषध देऊन खाली गेले अन् पण पुन्हा घरी आलेच नाहीत, अशी ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. भिवंडी शहरातील गंगारामवाडी परिसरात रणजीत सिंह कोहिनूर अपार्टमेंट A विंग मध्ये तिसऱ्या मजल्यावर राहत असून कोहिनूर बी विंग इमारतीचे पिलर दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र, अचानक इमारतीच्या खाली आरडाओरडा सुरू झाल्याने रणजीत सिंह आपल्या आजारी पत्नीला औषध देऊन तू 10 मिनिट थांब मी खाली बघून येतो असे म्हणत  इमारतीच्या खाली गेला आणि तो पुन्हा परतलाच नाही. इमारत कोसळल्याची बातमी पत्नीला मिळाल्यानंतर पत्नीचे रडून हाल झाले आहेत. पत्नीची फक्त एकच मागणी आहे माझ्या पतीला पुन्हा माझ्याजवळ द्या, त्यांच्या शिवाय माझा कोणीच नाही, अशी मन हेलावणारी घटना इथं घडली. 

इमारतीची पाहणी करत असतानाच संतोष पांडे यांचा दुर्दैवी मृत्यू

गंगाराम वाडी परिसरात कोहिनूर अपार्टमेंट ए विंग मध्ये दोन प्लेट असलेल्या संतोष पांडे इमारत धोकादायक नोटीस लागल्यापासून मागील दोन ते तीन दिवसांपासून ते इमारतीत राहत नव्हते. त्याऐवजी ते आपल्या व्यवसाय करत असलेल्या हॉटेलमध्येच झोपायचे. परंतु, आज इमारतीत नक्की काय काम चाललंय, कसं काम चाललंय हे पाहण्यासाठी ते इमारतीच्या खाली आले होते. त्या ठिकाणी पाहणी करत असतानाच अचानक संपूर्ण इमारत कोसळली आणि त्यात संतोष पांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संतोष पांडे यांच्या काकांनी शासनाकडे मागणी केली आहे की, अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार होत आहेत. त्यामुळे शासनाने अजून कडक पावले उचलली पाहिजे. जेणेकरून अशा प्रकारच्या दुर्घटना घडणार नाहीत. 

ढिगाऱ्यातून आई आणि पिल्लाची सुखरूप सुटका

गंगाराम वाडी परिसरातील कोहिनूर इमारत कोसळली आणि तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातच, ढिगाऱ्याखालून एनडीआरएफ टीम आणि टीडीआरएफचे टीम यांनी बचाव कार्य सुरू केल्यानंतर एक कुत्री आणि तिचा पिल्लू ढिगाऱ्यात अडकलेल्या पिल्लूला आणि तिच्या आईला जिवंत बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर या कुत्रीच्या पिल्लूला एका टबमध्ये ठेवण्यात आलं आणि तिची आई आपल्या पिल्लाच्या अवतीभवती फिरत होती. त्यानंतर आईने आपल्या पिल्लाला जवळ घेतलं आणि तिला घेऊन निघून गेली. मात्र, प्रशासनाने त्यांच्यावर उपचारासाठी काहीही केलं नाही.

पाय मोडला पण जीव वाचला

कोहिनूर इमारतीच्या ए विंगमध्ये दुरुस्तीचे काम सुरू होतं आणि अचानक जोरदार आवाज आला. त्यामुळे, पहिल्या मजल्यावर असलेले अभय यादव , दिपक यादव  आपल्या फ्लॅटमधून घाबरून बाहेर पडले, बघतात तर काय संपूर्ण इमारत कोसळली आहे. पळून जाण्यासाठी दुसरा पर्याय मार्ग नाही, कारण संपूर्ण जिना कोसळला  होता. त्यामुळे अजय आणि दीपक यांनी थेट पहिल्या मजल्यावरून उडी मारली व आपले जीव वाचवले, त्यानंतर अनेकांना शिडी लावून उतरवण्यात आले. यावेळी मनात फार भीती निर्माण झाली होती आणि जीव कसा वाचवावा असा विचार मनात येत होता. त्यामुळे पहिल्या मजल्यावरून उडी मारली व पाय मोडले पण जीव वाचला, असे त्यांनी म्हटलं. सध्या दोघा तरुणांवरती भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा

बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ