Bhiwandi Gas Shortage : आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही दिसू लागला आहे. कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील अनेक ढाबा आणि हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. काही ठिकाणी तर हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

Dhaba Hotel Business Bhiwandi : गॅसअभावी चुलींचा वापर सुरू

मुंबई-नाशिक महामार्ग, चाविंद्रा मार्ग आणि वाडा मार्गावर शेकडो ढाबे आणि हॉटेल आहेत. मात्र कमर्शियल गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळं अनेक हॉटेल चालकांनी पर्याय म्हणून पारंपरिक चूल आणि शेगड्यांचा वापर सुरू केल्याचं चित्र आहे.

गॅसच्या तुटवड्यामुळं हॉटेलच्या मेनूमध्येही मोठी कपात करण्यात आली आहे. पूर्वी 500 पेक्षा जास्त प्रकारचे पदार्थ देणाऱ्या काही हॉटेलमध्ये आता फक्त 5 ते 6 मर्यादित पदार्थच तयार केले जात आहेत.

Bhiwandi Hotel Workers Impact : व्यवसायिकांना आर्थिक फटका

गॅस तुटवड्यामुळं ढाबा आणि हॉटेल व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. याशिवाय या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पूर्वी ग्राहकांच्या गर्दीनं गजबजलेले ढाबे आता ओस पडल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

LPG Black Market : गॅस सिलेंडरचा काळाबाजार?

दरम्यान, कमर्शियल गॅसचा तुटवडा असताना काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचा आरोप ढाबा व्यवसायिकांनी केला आहे. बाजारभावापेक्षा जास्त दरानं गॅस विक्री होत असल्याचंही सांगितलं जातंय. 

या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तातडीने हस्तक्षेप करून कमर्शियल गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भिवंडीतील ढाबा आणि हॉटेल व्यवसायिकांनी सरकारकडे केली आहे.

पुण्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा

पुणे शहरात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅसचे बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये संताप वाढत आहे. विशेषतः पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील गॅस गोडाऊनबाहेर सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. अनेकांना सलग चार-पाच दिवस फेऱ्या मारूनही गॅस मिळत नाही. त्यामुळे गॅस एजन्सीच्या कार्यालयात नागरिक आणि एजन्सी मालक यांच्यात वारंवार वादावादी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

ही बातमी वाचा: