ठाणे : भिवंडी शहरातील स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा उड्डाणपूल अपघातांचा हॉटस्पॉट ठरला आहे. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास या पुलावर दोन भरधाव कारमध्ये धडक झाली. मात्र त्यामुळे मागे असलेल्या दुचाकीस्वाराची कारला धडक बसली आणि तो उड्डाणपुलावरून खाली उडून रस्त्यावर पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राहुल दादाराम तरे (वय 32 रा. अंजूर) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर या अपघातात कार चालक अब्दुल्ला मोहम्मद इलियास अन्सारी रा. मिल्लत नगर हा गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीकडून कल्याणच्या दिशेने होंडा सिटी कार क्रमांक एम एच 43 ए एफ 1601 चा चालक अब्दुल्ला मोहम्मद इलियास अन्सारी हा भरधाव वेगाने चालला होता. भादवड येथील अरिहंत सिटी समोर कार आली असता त्यावेळी समोरून येणाऱ्या महिंद्रा एक्सयूव्ही कार क्रमांक एम एच 48 बी एच 8198 यांच्यात जोरदार धडक झाली.
दोन्ही कारचे अतोनात नुकसान
या धडकेत दोन्ही कारच्या समोरील बाजूचे अतोनात नुकसान होऊन कार चालक अब्दुल्ला गंभीर जखमी झाला. तर महिंद्रा एक्सयूव्ही कारमधील एअर बॅग उघडल्याने त्यातील चालक बचावला. त्याला किरकोळ मार लागला आहे.
दुचाकीस्वार हवेत उंच उडाला
या अपघातात होंडा सिटी कार जागेवरच वळल्याने मागून वेगाने येणाऱ्या दुचाकीची धडक कारला बसली. त्यामध्ये दुचाकीस्वार राहुल तरे हा युवक थेट उड्डाणपुलावरून 50 फूट खालील रस्त्यावर फेकला गेला. त्यामुळे राहुलचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात अपघाती घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
सूर्या नदीत बुडून दोघांचा मृत्यू
पालघरमधील सूर्या नदीत वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कासा पोलिस ठाणे परिसरात या दोन्ही दुर्दैवी घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत वाघाडी येथील भीम बांध येथे विसर्जनासाठी गेलेल्या शांताराम चौरे याचा बुडून मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत सारणी येथील बाबल्या लाडवी याचा याच नदीत बुडून मृत्यू झाला. बुधवारी दुपार नंतर या दोघांचेही मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले.
ही बातमी वाचा:
- बसमधून खाली उतरताना चाकाखाली चिरडलं , बीडमध्ये कामावर जाताना महिलेचा दुर्दैवी अंत
- कुणबी सभा आटपून परतताना काळाची झडप, नियंत्रण सुटल्याने रिक्षा दुभाजकाला आदळली; तिघांचा करुण अंत