मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर आता त्यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत. त्यावर आता भाजपच्या आशिष शेलार यांनी विरोधकांचा समाचार घेतला. अक्षय शिंदेंला पोलिसांनी ठोकलं पण एन्काऊंटर विरोधकांचा झाला असा टोला आशिष शेलार यांनी लगावला. आम्ही जे पुरावे गोळा केलेत त्यावर विरोधक प्रश्न विचारत आहेत, पण हा देवाचा न्याय असल्याचं सांगत आशिष शेलार यांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचं समर्थन केलं. 


आशिष शेलार म्हणाले की, विरोधकांचा हा बेशरमपणा आहे. त्यांनी थोडं तरी अभ्यास करून बोलावं. त्यांना सर्व बाबींबर प्रश्न चिन्ह निर्माण करायचे आहेत. अक्षय शिंदे हा गुन्हेगार लिंगपिपासू आणि हे मविआवाले सत्तापिपासू आहेत. अक्षय शिंदे पोलिसाची बंदूक काढतो. विरोधकांनी आमच्या त्या चिमुरडीची मानसिकता तरी बघावी. आम्ही जे पुरावे गोळा केले त्यावर तुम्ही प्रश्न चिन्ह निर्माण करता? पोलिसाचा धाक हा असलाच पाहिजे. 


हा देवाचा न्याय


अक्षय शिंदेला ठोकला तर तुमचे गळे का बाहेर निघत आहेत? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला. ते म्हणाले की, अफझल गुरुच्या वेळी देखील विरोधकांनी असेच गळे काढले होते. अक्षय शिंदेचे हौतात्म्या करण्याच्या भानगडीत पडू नका. अक्षय शिंदेची बरसी साजरी करू नका. आम्ही पोलिसांबरोबर आहोत. हा देवाचा न्याय आहे, नियतीचा न्याय आहे. 


'आगे आगे देखो होता है क्या' असं सांगत यापुढए विरोधकांचा राजकीय एनकाऊंटर होईल, बोलती बंद होणार असा इशारा आशिष शेलार यांनी दिला. 


दरम्यान, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर आता विरोधकांनी सवाल केले आहेत. ज्या शाळेत मुलींवर अत्याचार घडला त्या संस्थाचालकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा आवाज बंद करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. 


आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला 6 प्रश्न विचारले आहेत, 


1. बदलापूरच्या शाळेचे ट्रस्टी कुठे आहेत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न भाजप सरकार का करतंय?


2. शिंदेचे स्थानिक आमदार वामन म्हात्रेला का वाचवलं जातंय? महिला पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्यांना म्हात्रेला सरकार का वाचवतंय?


3. आंदोलनकर्त्या बदलापुरकरांविरोधातील दाखल गुन्हे मागे घेतले जाणार का? गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी उशिर केला म्हणून ते नागरिक पोलिसांविरोधात केवळ आंदोलन करत होते.


4. शाळेचे विश्वस्त भाजपशी संबंधित असल्याची माहिती आहे. त्यांना वाचवलं जातंय अशी चर्चा आहे. हे खरं आहे का?


5. सरकार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल का?


ही बातमी वाचा: