मुंबई: मायक्रोमॅक्स या भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनीची उपकंपनी असलेल्या 'यू टेलिव्हेंचर्स' चा Yu सीरिजमधील पुढील स्मार्टफोन भारतात उद्या लाँच होणार आहे. यू यूनिकॉर्न असं या स्मार्टफोनचं नाव आहे. उद्या लाँच होत असलेला हा स्मार्टफोन फक्त फ्लिपकार्टवरच उपलब्ध होणार असल्याचंही यू टेलिव्हेंचर्सने जाहीर केलंय.


 

यापूर्वी या फ्लॅगशिपच्या लाँचिंगसाठी 19 मे ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र त्या दिवशी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी असल्यामुळे यू टेलिव्हेंचर्सने लाँचिंग इव्हेंट पुढे ढकलला.

 

यू टेलिव्हेंचर्सचा सध्या 'यू यूटोपिया' हा रूपये 24999 किंमतीचा स्मार्टफोन हा फ्लॅगशिप फोन आहे.

 

मायक्रोमॅक्सच्या यू टेलिव्हेंचर्सने गेल्याच महिन्यात यू युरेका नोट हा स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनची भारतातील किंमत रू. 13499 निश्चित करण्यात आली होती.

 

यू यूनिकॉर्न हा फ्लॅगशिप स्मार्टफोन संपूर्ण मेटल बॉडीचा असून त्याला शेम्फर्ड कर्व्ह एजेस आहेत. तसंच दर्शनी स्क्रीनवर खालच्या बाजूला एक होम बटन असून त्यामध्ये इनबिल्ट फिंगरप्रिंट स्कॅनर असण्याची शक्यता आहे. तसंच स्मार्टफोनच्या मागच्या बाजूला मध्यभागी कॅमेरा लेन्स असून वरील बाजूस हेडफोन जॅक तर खालच्या बाजूला स्पीकर आणि सी टाईप यूएसबी पोर्ट आहे.

 

यू यूनिकॉर्नचे स्पेसिफिकेशन्स अजून जाहीर करण्यात आले नसले तरी कालच जारी करण्यात आलेल्या टीव्ही अॅडनुसार, या स्मार्टफोनमध्ये  मीडियाटेक Helio X10 हा प्रोसेसर असणार आहे. तर यूनिकॉर्न स्मार्टफोनची रॅम 4 जीबी असेल.

 

तसंच यू टेलिव्हेंचर्सने आजवर लाँच केलेले सर्व फोन हे सायनोजेन ओएसवर आधारित होते, मात्र आता मायक्रोसॉफ्ट आणि सायनोजेन यातील पार्टनरशिप संपुष्टात आली असून यू यूनिकॉर्न हा बेसिक अँड्राईड ओएसवर आधारित असेल.

 

फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणजे त्या त्या स्मार्टफोन उत्पादक कंपनीचा सर्वात श्रेष्ठ असा, हायएन्ड स्पेसिफिकेशन्सचा स्मार्टफोन समजला जातो. मात्र यू यूनिकॉर्न हा स्मार्टफोन फ्लॅगशिप स्मार्टफोनची व्याख्याच बदलून टाकेल असा दावा करण्यात आला आहे.

 

मायक्रोमॅक्सच्या यू टेलिव्हेंचर्सने यू मालिकेत यापूर्वी यू यूरेका, यू यूफोरिया, यू युरेका प्लस, यू यूनिक आणि यू युटोपिया असे स्मार्टफोन लाँच केले आहेत.