व्हॉट्सअॅपवर लवकरच लाईव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंग सुविधा
एबीपी माझा वेब टीम | 24 Nov 2016 01:19 PM (IST)
मुंबई : व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने यूझर्स आनंदात आहेत. त्यातच आता व्हॉट्सअॅपही लवकरच लाईव्ह व्हिडीओ स्ट्रिमिंगही उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आहे. सध्या व्हॉट्सअॅपकडून लाईव्ह स्ट्रिमिंगची चाचणी सुरु झाली आहे. फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंगचा वापर अनेक जण करत आहेत. ट्विटरवरही पेरिस्कोपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रिमिंग शक्य झालं आहे. इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपनेही नुकतंच हे फीचर अपडेटमध्ये देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपही लाईव्ह व्हिडीओ स्ट्रिमिंगची चाचपणी करत आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ क्लिप्स किंवा व्हिडिओ लिंक पाठवता येतात. मात्र आता कोणत्याही घटनेचं लाईव्ह प्रक्षेपण शक्य होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून काही भारतीय यूझर्सवर ही चाचणी घेण्यात येत आहे. पर्सनल चॅट किंवा एकापेक्षा जास्त ग्रुप्समध्येही व्हिडिओचे लाईव्ह स्ट्रीमिंग शक्य होणार आहे. यात स्ट्रिमिंगसाठी व्हॉट्सअॅपचा नवीन इंटरफेस असणार आहे. व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच या मॅसेंजरच्या 'बीटा' आवृत्तीचा वापर करणार्या जगभरातील सर्व यूझर्सना हे फीचर मिळणार आहे.