नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या मोफत व्हॉईस कॉलिंग आणि डेटा ऑफरनंतर इतर टेलिकॉम कंपन्यांची ऑफर देण्यासाठी चढाओढ सुरु आहे. त्यातच आता व्होडाफोनने पुन्हा एक ऑफर आणली आहे.
व्होडाफोनच्या या नव्या ऑफरनुसार युझर्सना एक तासासाठी 16 रुपयात अनलिमिटेड 3G, 4G डेटा मिळणार आहे. 'सुपरआवर' असं या नव्या ऑफरचं नाव असून शुक्रवारी या प्लॅनची घोषणा करण्यात आली.
देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये ही ऑफर सुरु करण्यात आली आहे. 2G वापणाऱ्या ग्राहकांना 5 रुपये प्रतितास या दराने अनलिमिटेड डेटा वापरता येईल. तर 7 रुपये प्रतितास या दराने अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची देखील ऑफर आणली आहे, अशी माहिती व्होडाफोनने जारी केलेल्या एका पत्रकात दिली आहे.
दरम्यान व्होडाफोनची आठवड्यातील ही दुसरी ऑफर आहे. कारण काही दिवसांपूर्वीच व्होडाफोनने 2G मधून 4G मध्ये सिम अपग्रेड करणाऱ्या ग्राहकांसाठी अनलिमिटेड डेटा ऑफर आणली होती.