मुंबई: ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट 'स्नॅपडील'नं आपल्या ग्राहकांसाठी खास योजना आणली आहे. 'स्नॅपडील गोल्ड' या नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.


 

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉननं काही दिवसांपूर्वीच आपल्या ग्राहकांसाठी अशा योजना सुरु केल्या आहेत. 'फ्लिपकार्ट प्लस' आणि 'अमेझॉन प्राईम' या त्यांच्या योजना आहेत. यामध्ये ग्राहकांना मोफत शिपिंग, फ्री नेक्स्ट डे डिलिव्हरी तसेच ऑफरमध्ये प्राधान्य मिळतं.

 

'स्नॅपडील गोल्ड' ही योजना देखील तशीच आहे. पण यामध्ये ग्राहकांना कोणतीही वार्षिक रक्कम भरावी लागणार नाही. ही योजना पूर्णपणे मोफत असणार आहे. पण ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या ग्राहकांनाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे.

 

अॅमेझॉन प्राइम ही योजना देखील ग्राहकांसाठी 60 दिवस मोफत आहे. पण त्यापुढे जर ही सेवा हवी असल्यास त्यासाठी एक ठराविक रक्कम भरणं आवश्यक आहे. पण आता स्नॅपडीलनंही या दोन्ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटच्या एक पाऊल पुढं टाकलं आहे. त्यामुळे आता ग्राहक नेमकी कोणाला पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.