नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या स्नॅपडीलने देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टसोबत विलीनीकरणाची चर्चा रद्द केली आहे. स्नॅपडील स्वतंत्र मार्गाने व्यवसाय सुरु करणार आहे. मात्र कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली जाणार आहे, ज्यामध्ये 80 टक्के कर्मचाऱ्यांना घरी जावं लागेल, असं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

स्नॅपडीलने गेल्या काही महिन्यांपासून धोरणात्मक पर्यायांची चाचपणी सुरु केली होती. आता स्वतंत्रपणे मार्ग तयार करण्याचा निर्णय स्नॅपडीलने घेतला आहे. परिणामी सर्व प्रकारच्या धोरणात्मक चर्चांना स्नॅपडीलने पूर्ण विराम दिला असल्याची माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने दिली.

स्नॅपडील कमी महत्वाच्या मालमत्ता विकून आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या आठवड्यातच स्नॅपडीलकडून मोबाईल वॉलेट फ्रीचार्जची खरेदी 385 कोटी रुपयांमध्ये करण्याची घोषणा अॅक्सिस बँकेने केली आहे.

स्नॅपडील आर्थिक तोट्यात असल्यामुळे कंपनीने फ्लिपकार्टसोबत विलीनीकरण करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतल्याची चर्चा होती. मात्र आता कंपनीने सर्व प्रकारच्या धोरणात्मक चर्चांना पूर्ण विराम दिल्याची माहिती दिली आहे.