Jio, Airtel 5G Tariff Plan in India: देशात सध्या 5G मोबाईलची मोठी क्रेज वाढली आहे. अनेकजण 5G सेवा देशात सुरु होणार म्हणून अपडेटेड नवीन फोन खरेदी करत आहेत. अशातच रिलायन्स जिओने दिवाळीत आपली 5G सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. तर एअरटेलही लवकरच आपली 5G सेवा सुरु करेल. या दोन्ही कंपन्यांचे देशभरात मोठ्या प्रमाणात वापरकर्ते आहेत. Jio आणि Airtel ने 5G कनेक्शनसाठी जास्त दर न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच दोन्ही कंपन्यांचे ग्राहक सध्याच्या 4G टॅरिफवरच 5G च्या चांगल्या कनेक्टिव्हिटीचा लाभ घेऊ शकतात.


5G सर्व्हिसची तयारी सुरु 


जिओ आणि एअरटेलकडून सांगण्यात आले आहे की, दिवाळीच्या मुहूर्तावर दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकातामधील अनेक भागात 5जी सेवा सुरू केली जाईल. अशातच देशात 5G फोनची संख्या खूपच मर्यादित आहे. सध्याचे बहुतेक 5G हँडसेट विशिष्ट स्पेक्ट्रम बँड्सना सपोर्ट करत नाहीत. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात 5G सेवेला अधिक ग्राहक मिळणे कठीण असल्याचे मानले जात आहे. यामुळे 5G योजना स्वतंत्रपणे लॉन्च करण्याऐवजी, दोन्ही कंपन्या त्यांच्या विद्यमान प्लॅनमधील निवडक ग्राहकांना 5G सेवा प्रदान करण्याचा विचार करत आहेत.


5G सेवा घेताना सिम बदलण्याची गरज नाही 


ग्राहक  4G वरून 5G सेवेवर अपग्रेड केल्यानंतर सिम बदलावा लागणार नाही. त्याच टेलिकॉम ऑपरेटरना कळवावे लागेल की, आता तुमच्याकडे 5G हँडसेट आहे. अशातच कंपन्या या ग्राहकांना संदेश पाठवून त्यांचे 4G कनेक्शन थेट 5G मध्ये रूपांतरित करतील.


दरम्यान, एअरटेल आणि जिओ जवळपास एकाच वेळी 5G सेवा सुरू करणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 29 ऑगस्ट रोजी कंपनीच्या एजीएममध्ये दिवाळीच्या आसपास दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या प्रमुख भागात 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. यासोबतच डिसेंबर 2023 पर्यंत देशातील उर्वरित भागात 5G सेवा सुरू करण्याबाबत घोषणा केली होती. तर भारती एअरटेल ऑक्टोबरमध्येच आपली 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. मार्च 2024 पर्यंत देशातील 5000 हून अधिक शहरे आणि शहरांमध्ये ही सेवा विस्तारित करण्याची कंपनीची योजना आहे. Vodafone Idea ने अद्याप 5G सेवा सुरू करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.