मुंबई : स्वस्त-स्वस्त म्हणून प्रसिद्ध झालेल्या रिलायन्स जिओने गेल्या काही दिवसांपासून प्लॅन्सच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. आता नव्या वर्षात म्हणजे पुढच्या महिन्यात जिओ हे दर आणखी वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. ‘ओपन सिग्नल’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
रिलायन्सने सप्टेंबर 2016 मध्ये जिओ लाँच केल्यानंतर भारतीय दूरसंचार कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरु झाली. डेटाच्या किंमतीही 70 टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्यातच आता जिओ ही स्पर्धा थांबवण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्येही जिओने प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या होत्या.
‘ओपन सिग्नल’च्या वृत्तानुसार, जिओमुळे भारतात डेटा वॉर सुरु झालं आहे. हा ट्रेंड पुढच्या वर्षीपर्यंत कायम राहिल. म्हणजेच 4G जगतात जिओचा सध्या दबदबा आहे, तो पुढच्या वर्षीपर्यंत दिसेल. मोफत आणि स्वस्त डेटा दिल्यानंतर जिओ आता किंमतीमध्ये वाढ करु शकते, असं ‘ओपन सिग्नल’च्या एंडेरा टॉथ यांनी म्हटलं आहे.
ग्लोबल फर्म क्रिसिलच्या रिपोर्टनुसार, भारतातील डेटाची मागणी 2020 पर्यंत 40 टक्क्यांहून 80 टक्क्यांवर जाणार आहे. जिओच्या लाँचिंगनंतर भारतातील 4G युझर्स झपाट्याने वाढल्याचंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.