नवी दिल्ली: बीएसएनएलने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी शुक्रवारी धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार आता बीएसएनएलच्या ग्राहकांना 36 रुपयात 1GB, तर 78 रुपयात 2GB डेटा मिळणार आहे.


बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी ही अतिरिक्त डेटा प्लॅनची ऑफर उपलब्ध करुन दिली असल्याचं बीएसएनलने स्पष्ट केलं. तसेच 291 च्या रिचार्जवर 28 दिवसांसाठी 8 GB डेटा उपलब्ध करुन दिला आहे. तसेच 78 रुपयांच्या  या रिचार्ज प्लॅनमध्ये त्याला 2 GB चा डेटा मिळणार आहे. कोणत्याही कंपनीने इतक्या कमी किमतीत डेटा उपलब्ध करुन दिला नसल्याचा दावा बीएसएनएलने केला आहे.

दरम्यान, रिलायन्स जिओने 31 मार्च 2017 पर्यंत ग्राहकांसाठी मोफत 4G डेटा आणि फ्री कॉलिंग उपलब्ध करुन दिले आहे. पण तरीही जिओच्या ग्राहकांना सध्या दिवसाला 1 GB डेटा वापरायला मिळत आहे. यानंतर इंटरनेटचा स्पीड 128 Kbps मंदावतो.

आपल्या नव्या ऑफरची माहिती देताना, बीएसएनएलचे कस्टमर मोबिलिटीचे संचालक आर. के. मित्तल यांनी सांगितले की, इतर खासगी कंपन्या 50 रुपयात 1 जीबीचाच डेटा उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना यापेक्षी कमी दरात मोबाईल डेटा उपलब्ध करुन देत आहोत. ही ऑफर 6 फेब्रुवारीपासून देशात लागू होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

याशिवाय बीएसएनएलने या आधीच आपले नवे प्रीपेड प्लॅन घोषित केले असून, 26 रुपयांच्या स्पेशल टेरिफची मुदत 31 मार्चपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या प्लॅननुसार 26 रुपयात 26 रुपयांचा टॉकटाईम आणि 26 दिवसांची मुदत दिली आहे.

तर रिलायन्स जिओने लॉचिंगपासून तीन महिन्यात 5 कोटी वीस लाख ग्राहकांच्या मदतीने मोबाईल जगतातील इतर कंपन्यांसमोर एक तगडे आव्हान उभे केले आहे. तर दुसरीकडे बीएसएनएलने फिक्स ब्रॉडबॅण्डमध्ये 9 लाख ग्राहकांना आपलेसे केले आहे.  सध्या बीएसएनएल आपल्या 2 लाख ग्राहकांच्या मदतीने पाचव्या स्थानी आहे.