मुंबई : जर तुम्ही व्हॉट्सअॅप यूझर आहात, तर तुमच्यासाठी सावधानतेचा इशारा आहे. व्हॉट्सअॅपवरुन गेल्या काही दिवसांपासून एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप अकाऊंटला प्रीमियम ‘WhatsApp Gold’मध्ये अपडेट करण्यासाठी विचारणा केली जात आहे. मात्र, या मेसेजपासून व्हॉट्सअॅप यूझर्सनी सावध राहण्याची गरज आहे.
या मेसेजवर क्लिक केल्यास तुमचा डेटा धोक्यात येऊ शकतो. इंग्रजी वृत्तपत्र ‘द इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार, यूझर्सना मेसेजच्या माध्यमातून www.goldenversion.com ही लिंक दिली जात असून, अपडेट करण्याची सूचना केली जात आहे.
मेसेजमधून व्हॉट्सअॅपचं एक्स्क्लुझिव्ह व्हर्जन ‘WhatsApp Gold’ची ऑपर दिली जात आहे आणि हे व्हर्जन याआधी केवळ सेलिब्रिटीजसाठीच उपलब्ध होतं, असल्याचं सांगितलं जात आहे.
या नव्या ‘WhatsApp Gold’मध्ये दावा करण्यात आला आहे की, “यूझर्सना इमोजी, 100 हून अधिक फोटो पाठवण्याचे पर्याय, व्हिडीओ कॉलिंग आणि अनेक कस्टमायजेशन मिळणार आहेत. त्याचसोबत मेसेजमध्ये असंही म्हटलं आहे की, ज्यांना इन्व्हाईट पाठवण्यात आलं आहे, अशा यूझर्सनाच हे व्हर्जन मिळेल.”
मात्र आतापर्यंत हे कळू शकलेलं नाही की, किती यूझर्स या स्पॅमचे शिकार झाले आहेत. मात्र, एका अहवालानुसार, अँड्रॉईड यूझर्सना iOS च्या तुलनेत अधिक समस्येना सामोरं जाव लागत आहे.
हा मेसेज म्हणजे स्पॅम आहे, असे व्हॉट्सअॅपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय, यूझर्सना सतर्कता बाळगण्याचं आवाहनही व्हॉट्सअॅपकडून करण्यात आलं आहे. जर तुम्हाला अशाप्रकारचा मेसेज मिळाल्यास, तातडीने कंपनीला याबाबत माहिती कळवा, असेही व्हॉट्सअॅपने सांगितलं आहे.