नागपूर: विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे अनेक सवाल उपस्थित करत आहेत आणि आपल्याच सरकारला धारेवर धरताना दिसत आहेत. अशातच शेतकरी आणि गोरगरिबांचे प्रश्न मांडणे यात काहीही गैर नाही. मंत्रीपद असणे किंवा नसणे हे महत्त्वाचे नाही. मात्र काही जणांना असे वाटत असेल की, यामुळे माझी कोंडी होत आहे, तर तो त्यांचा गैरसमज आहे. अशा शब्दात स्पष्टीकरण देत भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेना उबाठा  गटाकडून मिळालेल ऑफरच्या चर्चेच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. ते नागपूर विमानतळावर बोलत होते. 

मंत्रीपदाशी काहीही संबंध नाही- सुधीर मुनगंटीवार  

मागील अनेक वर्षे आम्ही विरोधात असतानाही प्रश्न मांडले जात होते आणि त्याचा मंत्रीपदाशी काहीही संबंध नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यासाठीच राजकीय पक्षाची स्थापना झाली आहे, असेही ते म्हणाले. काही कंपन्याना सरकार सबसिडी देत असताना त्या सबसिडी सोबत खत देणे हा गुन्हा आहे. या संदर्भात चंद्रपूरला तक्रार केली आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक शेतकऱ्यांची बाजू घेत गुन्हा दाखल करून घेतला. जीवनावश्यक वस्तू कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचे ही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, लिंकिंगच्या बाबतीत दुकानदाराचे आग्रह आहे. मोठ्या कंपन्यांचे मालक हे जोर जबरदस्ती करतात. दुकानदार यांची बाजू मांडावी, यावर लक्ष्यवेधी टाकली असून शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याच्याही मागणी यातून केली असल्याचे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे हे भाजपवर टीका करणार नाहीत, अशी अपेक्षा करणं चुकीचं- मुनगंटीवार

उद्धव ठाकरे हे भाजपवर टीका करणार नाहीत, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. ते राज्याच्या प्रगतीसाठी काही विषय मांडतील, शोषित पीडित जनतेसाठी काही विषयांची मांडणी करतील ही अपेक्षाच नाही. दोन भाऊ एकत्र आले याचं स्वागत आहे. मात्र, त्यांनी कुठल्या मुद्द्यावर एकत्र यायचं हा त्यांचा विषय आहे. दोन भाऊ एकत्र आल्याने आम्ही आमचा अभ्यास काही कमी करणार नाही, मेरीटच्या विद्यार्थ्याला याची चिंता करायची गरज नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच, मराठी-मराठेत्तर संघर्ष निर्माण करुन भाजपने सत्ता मिळवली हे म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरे यांचा वेगळ्याच दिशेला विषय घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले. 

हे ही वाचा