Stampede In Jagannath Rath Yatra: पुरी रथयात्रेतील चेंगराचेंगरीनंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पुरीचे जिल्हाधिकारी आणि एसपी यांची बदली केली आहे. याशिवाय कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल डीसीपी विष्णू पती आणि कमांडंट अजय पाधी यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी (Mohan Charan Majhi) यांनी प्रत्येक मृत भाविकाच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी विकास आयुक्तांच्या देखरेखीखाली सविस्तर प्रशासकीय चौकशीचे आदेश दिले आहेत आणि जिल्हाधिकारी आणि एसपींची बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे चंचल राणा यांची नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर पिनाक मिश्रा यांनी नवीन एसपी म्हणून पदभार स्वीकारला आहे.
मी आणि माझे सरकार सर्व जगन्नाथ भक्तांची माफी मागतो- मुख्यमंत्री माझी
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी रविवारी (29 जून 2025) पुरी येथील मंदिराजवळ झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल भगवान जगन्नाथाच्या भक्तांची माफी मागितली. या घटनेत किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे श्री गुंडीचा मंदिराजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे 50 इतर लोक जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री माझी यांनी या दुर्दैवी घटनेवर भाष्य करत एक्स' वर पोस्ट केले आणि म्हटलं की, "मी आणि माझे सरकार सर्व जगन्नाथ भक्तांची माफी मागतो. चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या भाविकांच्या कुटुंबियांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो... हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना मिळावी अशी आम्ही भगवान जगन्नाथाकडे प्रार्थना करतो." दरम्यान या प्रकरणात सुरक्षेतील त्रुटीची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
चेंगराचेंगरी 3 जणांचा मृत्यू, 30 जखमी
ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान एक मोठा अपघात झाला. रविवारी पहाटे 4 वाजता गुंडीचा मंदिरासमोर भगवान जगन्नाथाच्या नंदीघोष रथाजवळ गर्दीत चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान 3 भाविकांचा मृत्यू झाला. 30 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे बसंती साहू (36), प्रेम कांती महंती (78) आणि प्रभात दास अशी आहेत. मृतदेह पुरी मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, रथ पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली असताना हा अपघात झाला. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि लोक पडल्याने चिरडले गेले. ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली त्या ठिकाणी पुरेसे पोलिस किंवा सुरक्षा दल तैनात नव्हते असे सांगितले जात आहे. भगवान बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ आधीच श्रद्धाबली (अंतिम बिंदू) येथे पोहोचले होते. नंतर, भगवान जगन्नाथाचा रथ गुंडीचा मंदिरात त्यांच्या मावशीच्या घरी पोहोचला.
इतर महत्वाच्या बातम्या